शिंदे गटातील अनेक मंत्र्यांच्या कारभारामुळे अनेक अडचणी, अजितदादांचे थेट अमित शाह यांच्याकडे गाऱ्हाणे

136

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमधील दरी कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसते आहे. राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये समन्वयाऐवजी गोंधळच अधिक दिसतो. शिंदे यांचे मंत्री आणि आमदार यांचा बोलघेवडेपणा आणि निधीवाटपातील अरेरावी इतर सत्ताधारी पक्षांसाठी विशेषत: राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच मुंब्रा येथील शिवसेना शाखेच्या निमित्ताने झालेला वाद हा उद्धव ठाकरे यांच्या पथ्यावरच पडणार असून, मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनाच त्यांच्या लोकसभा मतदारसंघात याचा फटका बसेल, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा कयास आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दोनच दिवसांपूर्वी भेट घेऊन यावरच चर्चा केल्याचे खात्रीलायकरित्या समजते. त्यामुळे आता येत्या काळात शिंदे यांना दिल्लीहून सबुरीचा सल्ला मिळतो की, त्यांचा आक्रमकपणा अधिक वाढतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारचा समन्वय चांगला राखत आहेत. मात्र शिंदे गटातील अनेक मंत्र्यांच्या कारभारामुळे भविष्यात अनेक राजकीय अडचणी उभ्या राहू शकत असल्याचे मतही अजित पवार गटातील नेते खासगीत व्यक्त करीत आहेत. अजित पवार गटातील अनेक आमदारांच्या निधीबाबतही आखडता हात घेतला जात आहे. त्यामुळे अनेक आमदारांच्या तक्रारींचा सूर वाढत आहे. मुंब्रा येथील शिवसेना शाखेच्या निमित्ताने झालेला वाद हा उद्धव ठाकरे गटाच्या फायद्याचा असून, स्वतः मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव ज्या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून जातात त्या मतदारसंघात अशा प्रकारचा नाहक वाद निर्माण करण्यामागे कोणताही शहाणपणा नाही, असे अजित पवार गटातील एका अत्यंत ज्येष्ठ नेत्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले.

अजित पवार गटातील आमदारांना छोट्या-मोठ्या कामांसाठीही सरकार दरबारी खेटे घालावे लागत असल्याने या अस्वस्थतेत भर पडत आहे. विशेषतः नगरपालिका, महानगरपालिका हद्दीतून निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात सत्तेचे फारसे लाभ पोहोचत नाहीत, ही त्यांची तक्रार आहे. तसेच सरकारमधील तिन्ही पक्षांच्या कोणत्याही कृतीचा तिन्ही पक्षांच्या राजकीय भवितव्यावर मोठा परिणाम होणार असल्याने कोणत्याही राजकीय कृतीपूर्वी किमान समन्वयाची गरज आहे, असे अजित पवार गटातील सर्वच प्रमुख नेत्यांचे म्हणणे आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रत्येक आरे ला कारे करण्याने राजकीयदृष्ट्या फायद्यापेक्षा तोटाच अधिक होतो, असे अजित पवार गटातील नेत्यांचे म्हणणे आहे. त्यांनी याबाबत अमित शहा यांच्याशीही बोलणे केल्याचे समजते. मात्र नेमके अमित शहा यांची अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्यानंतर लगेचच मुंब्र्यातील शाखेच्या निमित्ताने स्वतः उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर उतरून आक्रमक होण्याची संधी शिंदे गटाने दिल्याचे उदाहरण समोर आले आहे. त्यामुळे आता याबाबत भाजपचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी शिंदे यांचे कान टोचतात की, अजित पवार गटाच्या या कुरबुरीकडे दुर्लक्ष करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.