शास्तीकर, रेडझोन, खंडीत वीजपुरवठा या समस्या उद्योग मंत्रालया अंतर्गत येतात का?

65

– स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचाच हा प्रकार, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची घनघाती टीका

पिंपरी, दि. 25 (पीसीबी) – पिंपरी – पिंपरी-चिंचवड तसेच चाकण परिसरातील लघुउद्योजकांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकाचा केवळ फार्स करण्यात आला असून लघुउद्योजकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडला आहे. गेल्या दहा वर्षांत आपल्याच सत्ताकाळात एकही समस्या सोडवू न शकलेल्या भाजपच्या नेतृत्त्वाने आपल्याच अपयशाचा आरसा दाखविल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.

याबाबत अजित गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत भाजपच्या सत्ताधार्‍यांना एकही वेळेस लघुउद्योजकाची आठवण झाली नाही. महापालिकेशी निगडीत अनेक प्रश्न सोडविण्यासाठी कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. मात्र आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना लघुउद्योजकांचा पुळका आला आहे. महापालिका, महावितरण, वाहतूक विभागाशी संबंधित प्रश्नांवर उद्योगमंत्र्यांच्या सोबत बैठक घेण्यात आली आहे.

या बैठकीतून लघुउद्योजकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचाच प्रकार यातून करण्यात आला आहे. केवळ आश्वासने आणि सूचना यापलिकडे बैठकीत काहीच झाले नाही. एकाही विषयावर ठोस निर्णय झालेला नसतानाही ‘रेडकार्पेट’च्या गप्पा भाजपच्या नेत्यांकडून मारल्या जात आहेत, हे दुर्देव आहे.

गल्ली ते दिल्ली सत्ता उपभोगणार्‍या भाजप नेत्यांनी लघुउद्योजकांकडे आणि त्यांच्या समस्यांकडे दूर्लक्ष केल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील लघुउद्योजकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. बस सुविधा, कचरा समस्या, वाढत्या झोपडपट्ट्या, अनधिकृत भंगाराची दुकाने, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, महापालिकेकडून दिल्या जाणार्‍या समस्यांसाठी उद्योगमंत्र्यांसोबत बैठकीचा फार्स करणार्‍या भाजप नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून या समस्या का सोडविल्या नाहीत, याचे उत्तर पहिल्यांदा द्यावे. शास्तीकर, रेडझोन, खंडीत वीजपुरवठा या समस्या उद्योग मंत्रालया अंतर्गत येतात का? याची जाणिवही नसणारे लोक बैठका घेऊन समस्या सोडविल्याचा फार्स करतात यावरूनच त्यांची धडपड ही प्रश्न सुटावी म्हणून नव्हे तर निवडणुकीत दिसत असलेला पराभव टाळण्यासाठी आहे. कितीही खोटी आश्वासने देऊन नवीन गाजरे दाखविली तरी शहरातील जनता आणि लघुउद्योजक भाजपला येत्या महापालिका निवडणुकीत जागा दाखवून देईल, असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला.

रेडझोन, शास्तीकराचा विसर
सातत्याने रेडझोन सोडविण्याचे आणि शास्तीकर माफ करण्याचे आश्वासने भाजपने जनतेला दिले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्याच पक्षाचे सरकार असतानाही त्यांना हा प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. केवळ पत्रकबाजीत पुढे असणार्‍या भाजपचेच राज्यात सरकार आहे. शास्तीकरावर गळा काढणारे भाजप नेते शास्तीकरावर काहीच बोलायला तयार नाहीत. नवी ‘गाजरे’ दाखविण्याऐवजी गेल्या पाच वर्षांत काय काम केले त्याचा हिशोब त्यांनी जनतेसमोर मांडावा, असे आव्हानही अजित गव्हाणे यांनी केले आहे.