शस्त्र घेऊन सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

49

भोसरी, दि. २० (पीसीबी) – शस्त्र घेऊन त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. शाळा सोडून टवाळखोरी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी (दि. १९) दुपारी महात्मा फुले नगर येथे केली.

चेतन महिंद्र फाळके (वय १९, रा. एमआयडीसी भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार गणेश बोऱ्हाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आणि गुन्हेगारी कुरापतींवर पोलिसांची नजर आहे. एकाने शस्त्र घेऊन व्हिडीओ काढल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी निदर्शनास आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. पोलिसांनी व्हिडीओ मधील तरुणाची ओळख पटवून त्याला महात्मा फुले नगर परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्या साथीदाराने व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपी चेतन याच्याकडून ५०० रुपये किमतीची तलवार जप्त केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.