शरद पवार यांनी बोलावली राष्ट्रवादी आमदारांची बैठक

46

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : शिवसेनेचे नेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेसोबत महाविकास आघाडी सरकार देखील अडचणीत आले आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे आता सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांची बैठक घेतली त्यानंतर राज्यीतील सर्व आमदारांना मुंबईला पाचारण करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहाता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुंबईत बोलवण्यात आले आहे. शिवसेने देखील सर्व आमदारांना पत्र पाठवले आहे.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर महाविकास आघाडीतर्फे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत चर्चाच झाली नसल्याची माहिती आहे. नियमित विषयावर चर्चा करीत बैठक संपल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.