शरद पवार यांना शह देण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अधिवेशन

0
210

कर्जत, दि. २० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारले. त्यानंतर अजित पवार राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारसोबत गेले. अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर शरद पवार सक्रीय झाले. त्यांनी राज्याचे दौरे केले. सभा घेतल्या. त्यांना उत्तर देण्यासाठी अजित पवार यांनी उत्तरसभा घेतल्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा वाद विधासभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगात सुरु आहे. नवी दिल्लीत निवडणूक आयोगापुढे २० नोव्हेंबरपासून सुनावणी होत आहे. तसेच पक्षावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अजित पवार यांनी मोठी खेळी खेळली आहे. बंडानंतर पहिले अधिवेशन अजित पवार यांनी बोलवले आहे. येत्या 30 आणि 1 तारखेला अजित पवार गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे.

अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यात पक्षाचे अधिवेशन आणि मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जतला दोन दिवसीय अधिवेशन आणि मेळावा 30 आणि 1 तारखेला होणार आहे. या अधिवेशनला राज्यभरातून मराठा समाजातील पदाधिकारी येणार आहे. राज्यातील सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे. अधिवेशनच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असणार आहे. अधिवेशनाला अजित पवार यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे.

अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार नवी दिल्लीत आजपासून निवडणूक आयोगापुढे होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुक आयोगात राष्ट्रवादी नेमकी कुणाची याबाबत सुनावणी आजपासून तीन दिवस होणार आहे. दुसरीकडे शरद पवार देखील दिल्लीत या सुनावणीसाठी दाखल होणार आहे. आजच्या सुनावणीला सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार आहे. निवडणूक आयोगापुढे यापूर्वी २ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी दोन्ही गटाकडून बाजू मांडण्यात आली होती. शरद पवार गटाने अजित पवार गटाकडून खोटी प्रतिज्ञापत्र देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता आजपासून सुरु होणाऱ्या सुनावणीत दोन्ही गट काय भूमिक घेणार? याकडे लक्ष लागले आहे.