शरद पवार यांच्या सभेची पिंपरीगावात जोरदार तयारी

0
224

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड शहरामध्ये शरद पवार यांची २० जुलैला भव्य सभा होणार आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तसेच भाजपचे मिळून तब्बल ३३ माजी नगरसेवक प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणात या सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. वॉटरप्रूफ मंडप टाकला जात आहे. शहराच्या राजकारणाला नवे वळण देणारी ही सभा असेल, असे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी म्हटले आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील अजित पवारांची ताकद शरद पवार गट कमी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे माजी नगरसेवक यांच्यासह अजित पवारांच्या जवळचे स्थानिक नेते शरद पवार गटात येणार असल्याची माहिती तुषार कामठे यांनी दिली. २० जुलै रोजी भव्य सभा पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयात होणार आहे. याच सभेत अजित पवार गटाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नव्वद टक्के माजी नगरसेवक हे शरद पवार गटाच्या संपर्कात असून ते शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत. पैकी एक गट २० जुलै रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात येणार, असेही तुषार कामठे म्हणाले.