शरद पवार गटातील चौघांची खासदारकी रद्द करा, स्वतः पवार, सुप्रिया सुळे, कोल्हे यांना वगळले

211

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : मुंबई : शिवेसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे पक्षात उभी फूट पडली आणि राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. राष्ट्रवादी कोणाची, अध्यक्ष कोण? चिन्ह कोणाचं? यांसोबतच आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातही अनेक नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच शरद पवार गटानं अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र करा, अशी मागणी करणारं पत्र राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना पत्र लिहून केली आहे. आता यालाच पलटवार म्हणून अजित पवार गटानंही शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात याचिका लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे दाखल केली आहे.

शरद पवार गटाविरोधात अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार गटानं अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात राज्यसभेच्या सभापतींना एक पत्र लिहिलं. आता यालाच अजित पवार गटाकडून पलटवार करत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शरद पवार गटातील नेत्यांची खासदारकी रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका अजित पवार गटानं लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडे केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या याचिकेत अजित पवार गटाकडून शरद पवार, सुप्रीया सुळे यांची नावं वगळण्यात आली आहेत.

राज्यसभेतील शरद पवार, वगळता वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. तर, लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांना वगळून श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या कृतीमुळे पुन्हा अजित पवार गटात सुरू असलेला संभ्रम पुन्हा अधोरेखित झाला आहेच. तसेच, सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार गटाची ही खेळी असल्याचं बोललं जात आहे.

अजित पवार गटानं शरद पवार, सुप्रीया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं वगळली आहेत. शिंदे गटाचाच पायंडा अजित पवार गटानं पुढे चालवल्याचं दिसत आहे. ज्यावेळी शिवसेनेत फूट पडलेली, त्यावेळी शिंदे गटाकडून ठाकरे गटातील आमदार आणि खासदार यांचं सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी शिंदे गटानं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नावं वगळली होती. तीच भूमिका आता अजित पवार गटानं घेतली असून शरद पवार आणि सुप्रीया सुळे यांची नावं टाळली आहेत.

अमोल कोल्हेंनी दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र दिलंय; विश्वसनीय सूत्रांची माहिती
अजित पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेतून शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांचंही नावं वगळलं आहे. याकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अमोल कोल्हे नेमंके कोणत्या गटात? असा प्रश्न चर्चेत आहे. अशातच एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. तसेच, कोल्हेंनी शरद पवार गटालाही प्रतिज्ञापत्र दिलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच, अजित पवार गटानं आमचे लोकसभेत दोन सदस्य आहेत, एक सुनिल तटकरे आणि दुसरे अमोल कोल्हे. त्यामुळे शरद पवार गटाच्या खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करणं ही अजित पवार गटाची खेळी असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, आगामी काळात अजित पवार गट काय भूमिका घेणार? आणि शरद पवार गटाकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.