“शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष संपला”

0
504

शिवसेना एकाकी पडणार, भाजपची खेळी यशस्वी होणार ?

पुणे, दि. ११ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्योजक प्रतापराव पवार यांच्या घरी भेट झाली. या भेटीनंतर अजित पवारांनी तातडीने दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. या पार्श्वभूमीवर भाजपा समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केलं. “मी आधीच सांगितलं होतं की, दिवाळीच्या आसपास मोठा बॉम्ब फुटू शकतो,” असं रवी राणांनी सांगितलं. ते शनिवारी (११ नोव्हेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते. दरम्यान, शरद पवार आणि् अजित पवार यांच्यातील संघर्ष संपल्याचे वृत्त असून आगामी काळात शिवसेनेला एकाकी पाडण्याची भाजपची खेळी यशस्वी होणार अशी चर्चा आहे.

रवी राणा म्हणाले, “मी आधीच दसऱ्याच्या काळात सांगितलं होतं की, शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. दिवाळीच्या आसपास मोठा बॉम्ब फुटू शकतो. अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यावरून मला असं वाटतं की, ९९.९९ टक्के शरद पवार राजी झाले आहेत.”
“आता फक्त थोडा धक्का लागला पाहिजे. त्यानंतर शरद पवारही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. भाजपाबरोबर येतील. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष संपेल. त्यामुळे शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्रात शक्तीशाली सरकार येईल,” असा दावा रवी राणा यांनी केला.

“दिल्लीच्या स्तरावर राजकीय समीकरणं तयार होत आहेत. आजपर्यंत ज्या घटना घडल्या त्या अचानक झाल्या आहे. शरद पवारही भाजपाबरोबर आले, तर ताकद मिळेल आणि महाराष्ट्रात मजबूत, सक्षम सरकार येईल,” असंही रवी राणांनी नमूद केलं.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकिपूर्वीच या सर्व घडामोडी होतील. महापालिका आणि विधानसभा निवडणुकिला शिवसेनेला अक्षरशः एकाकी पाडण्याची भाजपची मोठी खेळी असून शरद पवार यांनी महाआघाडीतून अंग काढून घेतल्यास तो डाव यशस्वी होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.