शरद पवारांचे मोदींना आव्हान, “सिंचन, बँक घोटाळ्याची करा चौकशी…”

0
109

पुणे, दि. २५ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही काळात राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याचे आरोप केले होते. आता आमची मागणी आहे की, या घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, असे आव्हान शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना देत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

पुणे जिल्ह्यात पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यात शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडले. भाजपाची ज्या राज्यात सत्ता नाही, त्या राज्यातील सरकारांविरोधात असहकार पुकारण्याची नवी पद्धत मोदी सरकारने सुरू केल्याची टीका पवार यांनी केली. देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करण्याची एकही संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडत नाहीत. ज्या नेत्यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले, त्यांच्याविरोधात द्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे. पंडित नेहरुंनी देशातील संसदीय लोकशाहीला बळकट करण्याचे काम केले. पण पंतप्रधान मोदींच्या समोर माईक आला की लगेच ते पंडित नेहरुंवर टीका करतात, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधानांवर टीका केली.

इंडिया आघाडीचा पहिला मेळावा शनिवारी (ता. २४) पुण्यातील काँग्रेस भवनात झाला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना (उबाठा) नेते सचिन अहिर यांनीही सरकारवर टीका केली. आगामी निवडणुकीत मतदारच मोदी सरकारच्या चुकीच्या कामांना उत्तर देतील, असे त्यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्या करत आहेत. युवकांना रोजगार मिळवण्यासाठी धडपडावे लागत आहे. तर महागाईचा दर वाढतच असून सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकाच्या चुकीच्या धोरणांमुळे हे सर्व होत असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली.

गेल्या सत्तर वर्षांत अनेक राज्यकर्ते पाहिले. भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांचेही सरकार पाहिले. मात्र, गेल्या दहा वर्षांत मोदी यांची भूमिका देशाला दिशा देणाऱ्या व्यक्तींविषयी जनतेच्या मनात घृणा निर्माण करण्याची आहे. त्यामुळे लोकशाहीची चिंता वाटत आहे. नेहरू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ले करण्याचा आणि त्यांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम मोदी यांचा आहे, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ज्यांनी लाठ्याकाठ्या खाऊन भाजपला सत्तेवर आणले, ते आज कुठेच दिसत नाहीत. सत्तेच्या पंगतीत भलतेच जेवताना दिसत आहेत. ज्यांनी अशोक चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनीच चव्हाणांना भाजपमध्ये घेतले. भाजपने पक्ष, घरे तर फोडलीच, त्यासोबत पेपरही फोडण्याचे काम केले. देवेंद्र फडणवीस यांनी आजवर जे आरोप केले, त्याची श्वेतपत्रिका काढावी.