वेश्या व्यवसाय बंद करण्याची चिखलीतील रहिवाशांची मागणी; स्वराज्य संघटनेचा आंदोलनाचा इशारा

0
429

चिखली, दि.१७(पीसीबी) : थरमॅक्स चौक ते दुर्गानगर परिसरातील लॉजवर मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहे. या परिसरात नोकरीनिमित्त येणाऱ्या महिला, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली आणि स्थानिक रहिवासी महिला यांना त्याच नजरेतून पाहिले जात असून, अनेक महिलांना छेडछाडीचे प्रकारालाही सामोरे जावे लागत आहे. या प्रकारांमुळे महिला आणि मुलींची कुचंबणा होत असून, मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा प्रकार वेळीच थांबवा आणि येथील लॉजिंगवर चालणारे सर्व अनधिकृत व्यवसाय बंद करावेत. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वराज्य संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहर निमंत्रक विजय जरे आणि माहिती अधिकारी कार्यकर्ते किशोर तेलंग यांनी दिला आहे.

शहर पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, थरमॅक्स चौक ते दुर्गानगर या दरम्यान असलेल्या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे. या प्रकाराला राजकारणी तसेच स्थानिक पोलिस यांचा वरदहस्त आहे. या प्रकारामुळे या भागात कामानिमित्त येणाऱ्या महिला, कॉलेजला येणाऱ्या मुली आणि स्थानिक महिलांना छेडछाडीच्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील येणारे ग्राहक कॉलेजमध्ये येणाऱ्या मुली आणि महिलांकडे वाईट नजरेने पाहतात, त्यांची छेड काढून उलट प्रश्न विचारतात. येथे येणारी अनेकजण मद्यपान करून आलेली असल्याने या परिसरात वावरणाऱ्या कॉलेजमधील मुली आणि महिलांशी गैरवर्तन करतात. परिणामी महिलांची मोठी कुचंबणा होत आहे, त्यामुळे या परिसरातील लॉजिंगवर चालणारा वेश्या व्यवसाय त्वरित बंद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दुर्गा नगर चौक ते थरमॅक्स चौक येथील वेश्याव्यवसाय बंद करा – विजय जरे