वेदांत आगरवालच्या आजोबांचे छोटा राजनशी संबंध

0
118

पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघातात एक अल्पवयीन मुलगा दोषी आढळला आहे. मद्यधुंद अवस्थेत परवाना नसताना त्याने बेदरकारपणे वाहन चालवल्याने दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची आता चौकशी सुरू आहे. दरम्यान, या अल्पवयीन मुलाच्या आजोबांवरही खटला चालू आहे. शिवसेना नेते अजय भोसले यांच्या हत्येची सुपारी छोटा राजनला देण्यावरून हा खटला सुरू आहे. अजय भोसले यांनी आज टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण समोर आल्यानंतर अग्रवाल कुटुंबियांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर चर्चा केली जातेय. या प्रकरणातील आरोपीच्या आजोबांवरही खटला सुरू आहे. याबाबत अजय भोसले म्हणाले, “माझी आणि राम कुमार अग्रवाल यांच्याशी मैत्री होती. या दोन (सुरेंद्र अग्रवाल आणि राम अग्रवाल) भावांत मालमत्तेवरून काही वाद चालू झाले होते. त्यामुळे हा वाद मी मिटवावा अशी त्यांची इच्छा होती. परंतु, ही घरगुती समस्या असल्याने त्यांनी तो मिटवावा असं मी त्यांना म्हटलं. मी राम अग्रवालला सहकार्य करत असल्याचा दावा सुरेंद्र अग्रवालांनी केला होता. दरम्यान, हा वाद सुरू असताना सुरेंद्र अग्रवाल हे बँकॉगला जाऊन छोटा राजनला भेटून आले आणि त्यांना सुपारी दिली. त्यावेळी मला छोटा राजनचे फोन यायचे, मी त्याच्याशी फोनवर बोलायचो. मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुमच्या (अग्रवाल कुटुंबातील) घरातील भांडणं आहेत, तुम्ही घरात मिटवून घ्या. परंतु, सुरेंद्र अग्रवालने छोटा राजनला जाऊन सांगितलं की अजय भोसलेच हे घडवून (कुटुंबातील समेट) देत नाहीय.”

“२००९ साली वडगावशेरी येथून शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवत होतो. त्यावेळी सर्वांत पहिला गोळीबार सकाळी साडेदहा वाजता जर्मन बेकरी येथे झाला. परंतु, ती गोळी पिस्तुलातून निघालीच नाही. मग आम्ही त्यांचा पाठलाग केला. १५-२० फुटांचं अंतर होतं आणि दुसरी गोळी मारली. त्यावेळी ती गोळी माझ्या मित्राच्या छातीत घुसली. त्याला आम्ही तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी पोलीस केसही झाली. मग अग्रवालांचं नाव समोर आलं. पण २००९ सालापासून आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. सर्व पुरावे आहेत, पण अटक होत नाही”, असा आरोप अजय भोसले यांनी केला.

“पैशांच्या जोरावर सर्वकाही खरेदी करता येतं. रिक्षावाल्याच्या हातून असा अपघात झाला असता तर त्याला साधं पाणीही प्यायला मिळालं नसतं. आज तिथं बर्गर, पिझ्झा सर्व खायला मिळतंय. मी माझी केस लढतो आहे, पण आज ज्या दोन निष्पाप तरुणांचा बळी गेला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे”, अशी मागणी त्यांनी केली.