विसर्जन मिरवणुकांसाठी 4000 पोलिसांचा बंदोबस्त

0
36

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सुमारे 4000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकांसाठी पोलिसांनी चोख नियोजन केले आहे.

तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळाचे विसर्जन सातव्या दिवशी झाले. त्यासह शहराच्या विविध भागातील गणेश मंडळांचे सातव्या दिवशी विसर्जन झाले. सर्वाधिक विसर्जन मिरवणुका अनंत चतुर्दशीच्या दिवशी काढल्या जातात. मंगळवारी (दि. 17) या विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत.

पिंपरी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शगुन चौक मार्गे झुलेलाल घाटाकडे सर्वाधिक मिरवणुका निघतात. चिंचवड मध्ये चापेकर चौक मार्गे थेरगाव घाट या मार्गावर विसर्जन मिरवणुका काढल्या जातात. तसेच इतर भागातही मिरवणुकीचे नियोजन केले जाते.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दोन हजार 14 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यातील काही मंडळांचे विसर्जन झाले आहे. उर्वरित सर्व मंडळे मंगळवारी विसर्जन करणार आहेत. लाडक्या बाप्पाला निरोप देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख नियोजन केले आहे. ठीक ठिकाणी बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. वरिष्ठ अधिकारी सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

असा असेल बंदोबस्त
पोलीस निरीक्षक – 53

सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक – 245

अंमलदार – 2400

होमगार्ड – 500

दंगा काबू पथक – 11

एसआरपीएफ कंपनी – 1

बॉम्ब शोधक नाशक पथक – 1