विरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे यांच्या पीएने धमकी दिल्याचा आरोप

125

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – राज्यात सत्तांतराचं घमासान सुरू असतानाच नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी स्वीय साहाय्यकावर (पीए) गंभीर आरोप झाले आहेत. “बंडखोर आमदारांना विरोध का करता? विरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” अशी धमकी एकनाथ शिंदे यांच्या पीएने दिल्याचा आरोप जळगाव शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे. जळगाव शिवसेनेने बंडखोर आमदारांच्या विरोधात शनिवारी (२ जुलै) मोर्चा काढला. यावेळी सभेदरम्यानच हा फोन आल्याचं गुलाबराव पाटलांनी सांगितलं.

जळगावमध्ये बंडखोर आमदारांविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी गुलाबराव वाघ यांना एक फोन आला. “फोनवर बोलणाऱ्याने मी एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत आहे असं सांगितलं. आमदारांना विरोध का करता? असा सवाल करत त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली,” असा आरोप गुलाबराव वाघ यांनी केला. विशेष म्हणजे हा फोन सभेदरम्यानच आला होता. वाघ यांनी ज्या फोनवरून धमकी आली तो नंबरही माध्यमांना दाखवला.