विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडवर

0
72

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडवर आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठक घेणार आहेत. मनसेच नेते, सरचिटणीस तसंच मुंबईतील प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणूक तसंच संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपारी एक ते अडीचच्या दरम्यान पक्षातील विविध पद आणि जबाबदाऱ्यांसंदर्भात माटुंगा इथे कार्यक्रम पार पडणार आहे.

राज ठाकरेंना मोदींच्या शपथविधीला सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये नाराजीचा सूर
देशात तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झालं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान (Prime Minister Of India) पदाची शपथ घेतली. पण मोदींच्या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं नसणं हे चर्चेचा विषय ठरलं. राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चांनंतर मनसेमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरेंची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, आजच्या बैठकीत मनसेच्या आगामी विधानसभा निवडणुकांवरील भूमिकाही स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषद निवडणुकीतही भाजपसाठी मनसेची माघार
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसेच, राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात सभाही घेतल्या होत्या. पण लोकसभा निवडणुका संपल्यानंतर मात्र, भाजपची भूमिका बदलल्याचा सूर मनसेमधून उमटतोय. लोकसभेनंतर मनसेनं विधानपरिषद निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्यानुसार, अभिजीत पानसेंना मनसेकडून कोकण पदवीधरसाठी उमेदवारीही जाहीर करण्यात आली. भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असल्यामुळे मनसेनं जाहीर केलेल्या उमेदवारीनं अडचणी वाढल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर भाजपनं राज ठाकरेंची मनधरणी केली. राज ठाकरेंनी भाजपच्या विनंतीचा मान राखून अभिजीत पानसेंची उमेदवारी मागे घेतली.