विधानसभा निवडणुकिपूर्वी राज ठाकरे होतील शिवसेनाप्रमुख

0
147

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत अनेक राजकीय अंदाज बांधताना, गौप्यस्फोटांची मालिकाही केली. सध्याची राजकीय स्थिती बघता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होऊ शकतात, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर यांच्या तोंडी परीक्षेचा संपूर्ण भाग आज रात्री 9 वाजता तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता.

तोंडी परीक्षा कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांना शिवशक्ती-भीमशक्ती युतीबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. सध्या भाजपने राज ठाकरे यांना प्रचारात उतरवून भविष्याचा गेम प्लॅन केल्याचं दिसतंय असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध राज ठाकरे यांची शिवसेना असा संघर्ष भविष्यात उभा राहू शकतो. त्यावेळी ती सर्वायव्हलची अर्थात अस्तित्त्वाची लढाई असेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.

मला कुठेतरी जाणवायला लागलं आहे,की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सध्या अध्यक्ष जरी असले तरी नजीकच्या काळात राज ठाकरे हे अध्यक्ष होतात का? जी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्या शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे होऊ शकतात. आफ्टर लोकसभा आणि बिफोर विधानसभा म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे हे मनसे विलीन करुन अध्यक्ष होणार का किंवा शिवसेना पक्षप्रमुख पद हे राज ठाकरे यांच्याकडे जाणार का हे मला जाणवायला लागलं आहे.