दीड लाख पगारसाठी बॉम्ब गोळ्याचा वर्षाव सुरू असणाऱ्या इस्रायल मधे नोकरीला हजारो बेरोजगाराची फौज

0
58

पुणे, दि. 25 (पीसीबी) : इस्रायलमध्ये नोकरी मिळविण्यासाठी पुण्यात 17 सप्टेंबरपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील कामगारांची कमतरता दूर करण्यासाठी इस्रायलला 10,000 कुशल बांधकाम कामगार आणि 5,000 काळजीवाहू कामगाराची गरज आहे. त्यासाठी पुण्यात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. औंध भागात 17 तारखेपासून भरती प्रक्रिया सूरू झाली आहे.

इस्रायलला नोकरी मिळवण्यासाठी पुण्यात तुफान गर्दी झाली आहे. बंगालपासून उत्तर प्रदेशापर्यंत शेकडो तरुण पुण्यात दाखल झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बेरोजगार तरुणांनी रस्त्यावर संसार थाटला आहे. रस्त्यांवरच त्यांचं खाणं-पिणं सुरू आहे. इस्रायलमध्ये चांगला पगार मिळेल या आशेने मोठ्या संख्येने तरुण पुण्यात दाखल झाले आहेत.

सध्या इस्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. मात्र अशाही परिस्थितीत नोकरी आणि चांगली ऑफर दिली जात असल्याने तरुणांनी पुण्यात गर्दी केली आहे. गेल्या भरतीत 10,349 बांधकाम नोकऱ्यांसाठी निवडले गेले, त्यांना दरमहा अंदाजे 1.92 लाख पगार मिळाला, तसेच वैद्यकीय विमा आणि निवास यासारखे अतिरिक्त फायदे मिळाले आहेत.

ही मोहीम 17 सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि 25 सप्टेंबर 2024 पर्यंत चालणार आहे. भारत-इस्त्रायल वर्कफोर्स भागीदारी नवीन उंचीवर पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असून आंतरराष्ट्रीय कामगार सहकार्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या महत्त्वाकांक्षी भरती मोहिमेसाठी 12 इस्रायली अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ 16 सप्टेंबर रोजी भारतात आले आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला हरियाणा, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा येथे आयोजित केलेल्या सुरुवातीच्या मोहिमेला चांगले यश मिळाले. आत्तापर्यंत सुमारे 4,800 भारतीय कामगार इस्रायलमध्ये तैनात करण्यात आले आहेत. या कामगारांना प्रति महिना सुमारे 1.32 लाख रुपये पगार आणि 16,000 रुपये मासिक बोनस मिळत आहे. पहिल्या गटातील 1,500 कामगारांनी 18 सप्टेंबर 2024 रोजी इस्रायलला प्रवास सुरू केला. सद्यास्थितीत इस्रायलमधील कुशल भारतीय व्यावसायिकांची एकूण संख्या 5,000 हून अधिक झाली आहे. सध्याच्या टप्प्यात इस्रायली मंडळींकडून या फेरीत अतिरिक्त 10,000 उमेदवारांची शोध मोहीम सुरू आहे.

कौशल्याच्या चार प्रमुख क्षेत्रांवर लक्ष

1) फ्रेमवर्क

2) लोहकाम

3) प्लास्टरिंग

4) सिरेमिक टाइलिंग.

हा उपक्रम नोव्हेंबर 2023 मध्ये भारत आणि इस्रायल दरम्यान झालेल्या ऐतिहासिक सरकार ते सरकार कराराचा भाग आहे. महाराष्ट्र सरकारने या कार्यक्रमाला आपला पूर्ण पाठिंबा दिला आहे. ITI औंधला गंभीर पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक सहाय्य देत आहे