विकासाला खीळ घालण्यासाठी विरोधक गैरसमज व असंतोष पसरवत आहेत – श्रीरंग बारणे

0
30
  • देश अखंड ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची – बारणे
  • खारघर व कळंबोलीत महायुतीच्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • देशाला बलवान बनवणारे मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार – बारणे

कळंबोली, दि. 9 मे – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी खारघर आणि कळंबोली शहरात महायुतीच्या वतीने भव्य बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. कळंबोली शहरात रात्री झालेल्या सभेत खासदार बारणे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले.

खासदार बारणे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये व सभेस आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे तसेच भाजप व महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बारणे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत देशाला बलवान आणि गतिमान बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या विकासाला खीळ घालण्यासाठी विरोधक गैरसमज व असंतोष पसरविण्याचे प्रयत्न करीत आहे. या निवडणुकीत मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. आपला देश अखंड राहण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे.

जेएनपीटी सारखे आंतरराष्ट्रीय बंदर, दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल समुद्र सेतू, रेल्वेचा विकास, रस्त्यांचे जाळे, मेट्रो सर्व प्रकारच्या सेवा सुविधा मोदी सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत. अयोध्येत राम मंदिर उभारून त्याचा दर्शनाचा लाभ मोदींमुळे आपणा सर्वांना मिळाला आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच अन्न, पाणी, निवारा, आरोग्य या मूलभूत गरजा देखील पुरवण्याचे काम मोदी सरकारने सक्षमपणे केले आहे, याकडे बारणे यांनी लक्ष वेधले.

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, देशातील महिलांचा सर्वाधिक सन्मान मोदी सरकारने केला आहे. महिलांना सर्वाधिक मदत देण्याचे काम देखील मोदी यांनी केले आहे. लोकसभा व विधानसभेत 33 टक्के आरक्षण देऊन महिलांना राजकीयदृष्ट्याही सक्षम बनवले आहे. त्यामुळे देशातील स्त्री शक्ती देखील मोदी यांच्या पाठीशी आहे.

खारघर व कळंबोली येथे काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवसेनेचे तसेच महायुतीतील घटक पक्षांचे झेंडे घेऊन काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे दोन्ही शहरांमधील वातावरण ‘भगवे’ झाल्याचे पाहायला मिळत होते. ठिकठिकाणी खासदार बारणे यांचे औक्षणाने व पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात येत होते. काही ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने मोठे हार घालून बारणे यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यात आले.

‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’, ‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’, ‘तिसरी बार, आप्पा बारणे खासदार’, ‘मावळ का खासदार कैसा हो, आप्पा बारणे जैसा हो’, ‘होणार होणार, हॅटट्रिक होणार’, अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला. रॅलीतील विजय रथावर आरूढ झालेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी मराठी, हिंदी बरोबरच गुजराती भाषेतूनही मतदारांशी संवाद साधला.