वाहनचोरीचे चार गुन्हे उघड

65

पुणे, दि. १० : शहरात विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या एका तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन दुचाकी, एक रिक्षा ताब्यात घेतली.रोहीत राजू माने (वय २०, रा. दत्तनगर, भारत नगर, गुजर निंबाळकरवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुजर निंबाळकरवाडी येथे एक बारीक केस व काळसर रंग असलेला मुलगा या भागात येऊन दररोज दुचाकी न्याहाळत आहे.

तसेच या भागात तो दुचाकी वरून फिरत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असता, या वर्णनाचा एक मुलगा दुचाकी वरून फिरताना दिसून आला. त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता, तो जोराने दुचाकी पळवू लागल्याने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्याने आंबेगाव पठार येथून दुचाकी व रिक्षा चोरल्याचे कबूल केले असून त्याच्याकडून सर्व गाडया ताब्यात घेतल्या आहेत. त्याच्यावर कोंढवा, खडक आणि भारती विद्यापीठ ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.