“वास्तव आणि अनुभवातून साकारलेली साहित्यकृती श्रेष्ठ!” – राजन लाखे

0
141

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – “वास्तव आणि अनुभवातून साकारलेली साहित्यकृती श्रेष्ठ ठरते!” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी ऑटो क्लस्टर सभागृह, मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे केले. नाटककार नितीन सुतार लिखित ‘विधिलिखित’ या कादंबरीचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मुंबई येथील संत निरंकारी मंडळाचे स. वि. लव्हटे, उद्योजक सूर्यकांत खंडागळे – पाटील, अभिनेते सिद्धार्थ झाडबुके आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

राजन लाखे पुढे म्हणाले की, “नितीन सुतार लिखित ‘विधिलिखित’ या कादंबरीत वास्तव आणि अनुभव यांचा सुरेख समन्वय साधला असून तिच्या वाचनातून माणसाला स्वतःचा नव्याने शोध लागतो. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांनीही आवर्जून वाचावी अशी ही साहित्यकृती आहे!” भाऊसाहेब भोईर यांनी, “नितीन सुतार यांनी साहित्य क्षेत्र आणि रंगभूमीसाठी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे!” असे मत मांडले. स. वि. लव्हटे यांनी पुस्तकाचे अंतरंग विशद केले. लेखक नितीन सुतार यांनी आपल्या मनोगतातून, “जीवनात काहीतरी आक्रीत घडले की, माणूस हमखास त्याला ‘विधिलिखित’ असे संबोधतो; पण चांगली गोष्ट घडणे हेदेखील विधिलिखितच असते, अशी सकारात्मकता जनमानसात रुजावी म्हणूनच या कादंबरीचे लेखन केले आहे!” अशी भावना व्यक्त केली.

अपूर्व कला फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सुकन्या सुतार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.