वायसीएम मधील निर्जंतुकीकरण केंद्र अद्ययावत करणार; 17 कोटी 58 लाखांचा खर्च

41

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम संस्थेतील मध्यवर्ती निर्जंतुकीकरण केंद्र (सीएसएसडी) आवश्यक उपकरणांसह अद्ययावत करण्यात येणार आहे. त्याबरोबरच त्याचे नुतनीकरण करण्यात येणार असून या कामासाठी तब्बल 17 कोटी 58 लाख रूपये खर्च होणार आहे.  

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. येथील मध्यवर्ती निर्जंतुकीकरण केंद्र उपयुक्त आणि आवश्यक उपकरणांसह अद्ययावत करण्यासाठी वैद्यकीय तज्ञ सल्लागार समिती यांची 1 फेब्रुवारी 2022 रोजी बैठक झाली. या बैठकीत सीटीओ मार्फत 100 टक्के आऊटसोर्सिंग, 100 टक्के महापालिका आणि पीपीपी तत्वावर याप्रमाणे तीन पर्याय सुचविण्यात आले. तथापि, चंदीगड येथील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम संस्थेस दिलेल्या भेटीदरम्यान त्याठिकाणी सीएसएसडी यंत्रणा ही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम संस्थेमार्फत स्वत: चालविण्यात येत असल्याबाबत अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी माहिती दिली. त्यानंतर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत सीएसएसडी प्रकल्प 100 टक्के महापालिकेमार्फत कार्यान्वित करून महापालिकेमार्फतच चालविण्यात यावा, असे ठरविण्यात आले.

वायसीएम रूग्णालयामार्फत सीएसएसडी प्रकल्पासाठी मागविलेल्या दरपत्रकांमध्ये 24 कोटी 70 लाख असा लघुत्तम दर सादर झाला. तथापि, बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील सीएसएसडी यंत्रणेकरिता सल्लागाराकडून 11 कोटी 16 लाख रूपये दर सादर झाला आहे. तसेच पायाभुत सुविधांसाठी 3 कोटी 92 लाख रूपये असा एकूण 15 कोटी 9 लाख रूपये खर्चाचा तपशील प्राप्त झाला आहे. त्यानुसार, वायसीएम रूग्णालयासाठी यापूर्वी दिलेल्या यंत्रणेच्या मागणीचा पुर्नआढावा घेण्यात आला. त्यामध्ये बारामती शासकीय रूग्णालयातील यंत्र साहित्याची तुलना करून वायसीएम रूग्णालयासाठी खरेदी करायच्या सीएसएसडी यंत्रणेकरिता अंदाजे 11 कोटी 9 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला.

वायसीएम रूग्णालयाची इमारत 25 वर्षे इतकी जुनी आहे. सीएसएसडी यंत्रणेसाठी स्लॅबचे वॉटर प्रुफींग करणे, नवीन टाईल्स बसविणे, संपूर्ण हिटींग आणि एअर सिस्टीम तयार करणे, एसएस पॅनलींग आणि एसएस सिलींग, इलेक्ट्रीकल व प्लबिंग यासह अनेक कामे करावी लागणार आहेत. तथापि, यातील बहुतेक बाबींचा समावेश एसएसआर विंâवा डीएसआर मध्ये नसल्याने अंदाजपत्रकीय दरांकरिता मागविण्यात आलेल्या लघुत्तम दरपत्रकामधील प्राप्त दर विचारात घेऊन वायसीएम रूग्णालयासाठी एअर सिस्टीम सिव्हील, इलेक्ट्रीकल अ‍ॅण्ड प्लंबिंग कामाकरिता प्राप्त दरानुसार, 6 कोटी 68 लाख रूपये असा एकूण 17 कोटी 78 लाख रूपये इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला.

त्यानुसार, इच्छूक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. निविदा काढण्यापूर्वी स्थापन केलेल्या समितीने या कामासाठी काही अटी-शर्ती ठेवल्या. त्यामध्ये पिंपरीतील निर्मिती इंजिनिअरींग कॉर्पोरेशन यांनी या कामासाठी निविदा दरापेक्षा 1.13 टक्के म्हणजेच 17 कोटी 58 लाख रूपये असा लघुत्तम दर सादर केला. त्यामुळे त्यांची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे.