वंचित ही तर भाजपची बी टीम, वंचितला मतदान करू नका – तुषार गांधी

0
156

दि १२ एप्रिल (पीसीबी )- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली असून, उमेदवारांच्या प्रचाराला रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात महाविकास विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीबरोबर जागावाटपाची बोलणी फिस्कटल्याने वंचित बहुजन विकास आघाडीने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आत्तापर्यंत राज्यातील २२ लोकसभा मतदारसंघांत उमेदवार जाहीर केले आहेत, तर दोन ते तीन ठिकणचे उमेदवार बदलले आहेत.

महाविकास आघाडीत सहभागी होऊन वंचितने निवडणूक लढवावी, असा आग्रह महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होता. यासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी वारंवार चर्चादेखील केली जात होती. मात्र, जागावाटप योग्य पद्धतीने होत नसल्याचे कारण पुढे करत आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडणे पसंत केले. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे जाहीर करत काही ठिकाणी त्यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणादेखील केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या निर्णयावर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.

भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढविणे गरजेचे होते. मात्र, वंचितने स्वतंत्र उमेदवार देत चूक केली आहे. वंचित विकास ही भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याने महाविकास आघाडीत सहभागी न होण्याचा निर्णय वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला असल्याचा आरोप गांधी यांनी केला. वंचित भाजपला मदत करत असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत वंचितला मतदान करू नका. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या उमेदवारांना मतदान न करण्याचे जाहीर आवाहन गांधी यांनी केले