लोकसभा निवडणुकीबाबत व्हायरल होणाऱ्या तारख खऱ्या की खोट्या

0
131

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी थोडेच दिवस उरले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील विविध राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत एक मेसेज व्हॉटसअपवर फिरत आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगानेच संबंधित व्हायरल मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन करते, असंही सांगण्यात आलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होत असलेल्या मेसेजवर केंद्रीय निवडणूक आयोगानंच स्पष्टीकरण दिलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत खोटा मेसेज व्हायरल होत असल्याचं आयोगानं सांगितलं आहे. व्हॉटसअपवरुन शेअर केला जाणारा मेसेज चुकीचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या नाहीत, असंही सांगण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगानं ज्या मेसेजचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये काही तारखा देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये निवडणुकीची अधिसूचना, अर्ज दाखल करण्याची तारीख, मतदानाची तारीख आणि निकालाची तारीख देण्यात आली आहे. मात्र, या सर्व गोष्टी खोट्या असल्याचं स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आलं आहे.