लाचखोर सात कर्मचारी पुन्हा महापालिका सवेत, प्रशासक शेखर सिंह यांचा निर्णय

0
400

पिंपरी, दि.23 (पीसीबी) – काम करण्यासाठी तसेच, बिल मंजुर करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी उद्यान, नगर रचना आणि आरोग्य विभागाच्या सात कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले होते. निलंबन आढावास समितीने शिफारस केल्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला आहे.

उद्यान विभागाचे असिस्टंट हॉर्टीकल सुपरवाझर संतोष लांडगे, संजीव राक्षे, माळी तथा उद्यान सहायक मच्छिंद्र कडाळे, भरत पारखी, नगर रचना विभागाचे सर्व्हेअर संदीप लबडे, आरोग्य विभागाचे सफाई कामगार दिलीप गायकवाड व सचिन डोळस यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे रंगेहाथ अटक केली होती.

यामधील चार कर्मचा-यांची महापालिकडून विभागीय चौकशी सुरू आहे. तर, तीन कर्मचा-यांची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. चौकशी न्यायालयीन व सुनावणीचा अंतिम निर्णयाच्या अधिन राहून त्यांचे निलंबन रद्द करण्याची शिफारस निलंबन आढावा समितीने केली. त्यांचे निलंबन रद्द करून अकार्यकारी पदावर व जनसंपर्क येणार नाही अशा ठिकाणी त्यांना नेमणूक देण्याची शिफारस समितीने केली आहे.

त्यानुसार सात कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहेत. लांडगे, राक्षे, कडाळे, पारखी यांना पुन्हा उद्यान विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. तर, सर्व्हेअर लबडे यांना निवडणूक विभाग, सफाई कामगार गायकवाड व डोळस यांना आरोग्य मुख्यालयात नेमण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहे.