रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार या सुळेंच्या डमी उमेदवार

0
66

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा अजित पवार यांच्या लढतीमध्ये आता वेगळाच ट्विस्ट आला आहे. सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला असून त्यांच्यासोबत अजित पवार यांच्या नावाने देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. यावरून विविध प्रकारची सर्वत्र चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

निवडणुकीत खबरदारी म्हणून विश्वासू व्यक्तीच्या नावाने डमी अर्ज भरण्याची पद्धत आहे. परंतु, सुनेत्रा पवार यांच्यासोबत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांच्या नावाने सुद्धा उमेदवारी अर्ज घेतला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा दादांचा प्लॅन बी आहे की, ए आहे, यावर चर्चा सुरू आहे. काहीजण या निवडणुकीत धक्कातंत्राचा वापर होऊ शकतो, असेही म्हणत आहेत.

अजित पवारांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याचे वृत्त आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक टीका करताना म्हटले होते की, दिल्लीवरून आदेश आले असतील तर दादा काहीपण करतील. आधी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अजित पवार हे स्वत: आदेश द्यायचे.

आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो. अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि दिल्लीवरून आदेश आला की, तुमचा अर्ज कायम ठेवा आणि काकींचा अर्ज मागे घ्या, तर अजितदादांना ते मनाविरुद्ध असले तरी ऐकावे लागेल. त्यामुळे ते त्याबाबतीत काय करतात हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. परंतु, आता अजित पवारांच्या उमेदवारी अर्जाची चर्चा सुरू असतानाच आता रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही बारामती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याने बारामतीच्या लढतीत मोठा ट्विस्ट आला आहे.