रोहित पवार यांची दसऱ्यापासून पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा

0
311

पुणे, दि. ३ (पीसीबी) : राज्यात सुरू असलेल्या राजकीय धोरणांमुळे युवा वर्ग मोठा प्रमाणात भरडला गेला आहे. स्पर्धा परीक्षा देणारे युवा, उत्तीर्ण होऊन सुद्धा बेरोज असलेले उमेदवार, कंत्राटी पद्धतीत सुरू झालेली नोकरभरती. अश्या सगळ्या युवांचे प्रश्न घेऊन आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. पुणे ते नागपूर या यात्रेचा मार्ग असणार आहे. रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद पुण्यात आयोजित करण्यात आली होती.

आज राज्यात शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका हा सर्वसामान्य युवांना बसत आहे. शासनाच्या या धोरणांचा राज्यात सर्वत्र विरोध होत आहे. अशातच राज्याच्या विविध भागात युवावर्ग आंदोलन देखील करत आहे. परंतु सरकार मात्र आपल्या राजकारणात व्यस्त असल्याने त्यांचे युवा वर्गाच्या या विषयाकडे सपशेल दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फी परवडत नसल्याने फी कमी करण्याची मागणी विधानसभेत आम्ही आग्रहीपणे मांडली यावेळी सिरीयसनेस यावा यासाठी परीक्षा फी १००० रुपये ठेवल्याचे सरकारने सांगितले. पेपरफुटी संदर्भात सांगितलं तर सरकार हक्क भंग आणण्याची भाषा करते, कंत्राटी भरतीचा मुद्दा मांडला तर सरकार सांगते एका कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन कर्मचारी काम करतील.

एकूणच सरकारच्या संवेदना संपल्या असून सरकार युवकांना गृहीत धरून चालत आहे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गांधी जयंतीच्या निमित्ताने आम्ही आदरणीय पवार साहेबांशी याबाबत चर्चा केली आणि यावेळी पवार साहेबांनी राज्यव्यापी युवा संघर्ष यात्रा काढून युवांशी संवाद साधण्याच्या सूचना आम्हाला केल्या त्यानुसारच राज्यातील तमाम तरुणांशी संवाद साधण्यासाठी आणि युवा वर्गाला पाठिंबा देण्यासाठी एका नवीन उपक्रमाची सुरुवात आपण करत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

युवा संघर्ष पदयात्रा का?
‘राजकारणात आल्यापासून युवकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतोय. सद्यस्थितीत राजकारणाची पातळी घसरत असल्याने आपण राजकारणात का आलो असा प्रश्न मनात आला होता. पण हार मानून घरी बसण्यापेक्षा लढत राहायचे आणि काम करायचे असा निर्णय घेतला. ‘युवकांचे प्रश्न सुटत नाही त्यासाठी काय केले पाहिजे’, याबाबत शरद पवार यांच्याशी नुकतीच चर्चा केली. त्यावर ‘युवकांचे प्रश्न हातात घ्या. त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करा’, असा सल्ला त्यांनी दिला. त्यावेळी युवकांशी राज्यभर संपर्क साधण्यासाठी संपर्कयात्रा काढता येईल, असे मनात आले. कुटुंबांशी, पत्नीशी बोललो. त्यांना माझी भूमिका सांगितली. त्यामुळे युवकांच्या प्रश्नांसाठी ‘युवा संघर्ष यात्रा’ ही पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

येत्या २४ ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्ताने पुण्यात पदयात्रेला प्रारंभ होईल. सावित्रीबाई आणि महात्मा फुले तसेच लाल महाल येथे नतमस्तक होऊन पाच ते सहा किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली जाईल. त्यानंतर शिरुर तालुक्यातील वढू तुळापूरला संभाजी महाराज यांना वंदन करून दुसऱ्या दिवसापासून पदयात्रेला पुन्हा प्रारंभ होणार आहे. नऊ ऑक्टोबरला यात्रेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर होणार आहे. पदयात्रेदरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी शरद पवार येणार आहेत, असे रोहित पवार यांनी सांगितले. कंत्राट भरतीला स्थगिती द्यावी. तलाठी भरतीसह अन्य परिक्षांसाठी असलेले शुल्क रद्द करावे. दत्तक शाळांचा आदेश रद्द करावा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळे आहेत पण तेथे औद्योगिक कंपन्या आल्या नाहीत त्या ठिकाणी प्रकल्प आणावेत यासारख्या मागण्या या पदयात्रेद्वारे करण्यात येणार आहेत.