रेल्वेतून उडी मारून आरोपी बेडीसह पळाला

0
155

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला दिल्लीतील एका न्यायालयात हजर करून परत आणताना रेल्वेतून उडी मारून आरोपीने बेडीसह पळ काढला. ही घटना तळेगाव ते बेगडेवाडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली. विशाल हर्षद शर्मा असे पळालेल्या आरोपीचे नाव आहे.

विशाल शर्मा याला एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. दरम्यान तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. त्याला दिल्ली येथील गुरुग्राम न्यायालयात पुणे कोर्ट कंपनीने हजर केले होते. त्याला दिल्ली येथून रेल्वेने पुणे येथे आणले जात होते.

दिल्ली ते मुंबई प्रवास आल्यानंतर त्याला मुंबईहून पुण्यात आणताना तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकाच्या पुढे बेगडेवाडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे थांबली असता विशाल शर्मा याने बेडीसह रेल्वेतून उडी मारली आणि पळ काढला.

त्याला शोधण्याचा प्रयत्न केला असता तो मिळून आला नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.