राहुल नार्वेकरांचा निकाल म्हणजे हास्यजत्रा

0
304

मुंबई, दि. १६ (पीसीबी) -राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल गुरुवारी समोर आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर काही महिने याप्रकरणी सुनावणी झाली. नार्वेकर यांनी दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेले पुरावे, दस्तावेज तपासले. तसेच दोन्ही गटांमधील नेत्यांची उलटतपसाणी करून अखेर याप्रकरणाचा निकाल सुनावला आहे. नार्वेकर यांनी शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. तसेच अजित पवार गटातील आमदारांना पात्र ठरवलं आहे. सुप्रिया सुळेंनी हा निकाल म्हणजे शिवसेनेच्या निकालाची कॉपी पेस्ट असल्याचं म्हटलं आहे. तर संजय राऊत यांनीही राहुल नार्वेकरांवर टीका केली आहे.

राहुल नार्वेकरांचा निर्णय काय?
राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याच्या निर्णयाचा आधार घेत शरद पवार गटाकडून सादर केलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत. नार्वेकर निकाल वाचताना म्हणाले, अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला विधानसभेच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४१ आमदारांचा पाठिंबा आहे. तर शरद पवार यांच्याबरोबर केवळ १२ आमदार आहेत. शरद पवार गटाने या दाव्याला कुठेही आव्हान दिलेलं नाही. त्यामुळे दोन्ही गटांचं संख्याबळ इथे स्पष्ट होत आहे. त्यानुसार अजित पवार गटाकडे विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. अजित पवार गटाकडे पदाधिकारी आणि नेत्यांच्या मतांचा अधिक पाठिंबा आहे. यासंबंधी अजित पवार गटाने सादर केलेल्या दस्तावेजांना शरद पवार गटाने आव्हान दिलेलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाला विधीमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे असंही राहुल नार्वेकर म्हणाले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुमचं घर वडिलांच्या नावावर असतं. वडिलांना घराबाहेर काढणार का तुम्ही? आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे संस्कार घेऊन पुढे चाललो आहोत. त्यांनी वडिलांसाठी १४ वर्षांसाठी वनवास भोगला. त्या रामाचे संस्कार आमच्यावर झाले आहेत. त्यामुळे ज्येष्ठांचा सन्मान करणं हे संस्कार आमच्यावर झाले आहेत. माझ्या आई-वडिलांचं लग्नही रामाच्या मंदिरातच झालं आहे”, असं त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रातल्या मराठी चॅनलवर एक कार्यक्रम सादर होतो. हास्यजत्रा, एकदमच कॉमेडी कार्यक्रम आहे. राहुल नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा नवा भाग लिहिला आहे. आधी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेंना दिली. शरद पवार हयात आहेत तरीही त्यांचा पक्ष अजित पवारांना देऊन टाकला. लोक हसत आहेत, त्यामुळे लोक त्यांच्या निर्णयाला मोठ्याने हसत आहेत. असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.