राष्ट्रवादीच्या माजी खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

72

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मागील काही दिवसांपासून अंतर्गत कलह सुरू असल्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादीचे नेते खासदार अमोल कोल्हे यांचे नाव गुजरात निवडणूकीसाठीच्या स्टार प्रचारकांमधून वगळल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. यादरम्यान राष्ट्रवादीचे दुसरे नेते माजी खासदार माजिद मेमन यांनी 16 वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहिल्यानंतर पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे, त्यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

मेमन यांनी तात्काळ पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले असून, त्यांनी शरद पवार यांचे आभार देखील माणले आहेत. “माझ्या 16 वर्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मला सन्मान आणि अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचे मी आभार मानतो. वैयक्तिक कारणास्तव मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्यत्व सोडत आहे. पवार साहेब आणि पक्षाला माझ्या सदैव शुभेच्छा” मेमन हे २०१४ ते २०२० या कालावधीत राज्यसभा खासदार होते.

दरम्यान माजिद मेमन यांना पक्षाच्या सदस्यत्वाचा अचानक राजीनामा दिल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे बोलले जात आहे.