राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला भाजपमधून फोन

218

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. असं असलं तरीही भाजप कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. त्यामुळे भाजपकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पाठीमागून सूत्र हलवित असल्याची माहिती आहे. असं सगळं चित्र असताना एक ताजी बातमी हाती येतीय.

भाजपच्या एका मोठ्या नेत्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला फोन आला असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सध्या राष्ट्रवादीची यशवंतराव चव्हाण सभागृहात महत्वाची बैठक सुरु आहे त्यामुळे ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभ अशा स्वरूपाच्या चर्चांना उधाण आलय. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट दाखविले जात आहे. अडिच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राष्ट्रवादीला मोठा हादरा दिला होता.

शरद पवार यांनी त्यावेळी सर्व परिस्थिती हातात घेऊन बाजी पलटविली होती. तेव्हापासून अजित पवार हे सतत भाजपाच्या संपर्कात आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याबाबात अजित पवार यांच्यावर ईडी कारवाईच्या तयारीत होती, पण त्या कारवाईला आता ब्रेक लागला आहे.असे असेल तर बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा पेच असू शकतो. राष्ट्रवादी काॅंग्रेसने 2014 मध्ये भाजपला स्वतःहून पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शिवसेनेचे महत्व कमी झाले होते. तसेच भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या निर्णयामुळे झाल्याचा दावा नंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सध्याच्या खेळीमुळे एकनाथ शिंदे यांचे महत्व कमी होऊ शकते.

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमची विरोधात बसण्याची तयारी असल्यचाे सांगितले होते. त्यानंतरही राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील चर्चेच्या बातम्या येत आहेत. राजकारणात काहीही घडू शकते, त्यामुळे सध्या राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहते, हे सांगता येत नाही.