रामतांडव’ स्तोत्राला प्रथम क्रमांक

141

पिंपरी, दि.२५ (पीसीबी ) क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती (चिंचवड)च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महिला सांघिक स्तोत्रपठण स्पर्धेत ‘रामतांडव’ या स्तोत्राच्या सांघिक सादरीकरणाला रोख पाच हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि प्रशस्तिपत्रक प्रदान करून स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे शनिवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी सन्मानित करण्यात आले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, सदस्य आसाराम कसबे, डॉ. नीता मोहिते, महिला विभागप्रमुख सुनीता शिंदे यांच्यासह नटराज जगताप, वर्षा जाधव, अश्विनी बाविस्कर, वासंती तिकोने, आशा हुले आणि अतुल आडे यांची उपस्थिती होती. संस्कृत, मराठी आणि हिंदी यापैकी एका भाषेची निवड करून अठरा वर्षांच्या वरील महिलांसाठी सांघिक स्तोत्रपठण स्पर्धेत एका संघात किमान बारा आणि कमाल पंधरा स्पर्धकांचा सहभाग हे स्पर्धेचे निकष होते. सुमारे सोळा संघांच्या माध्यमातून एकूण दोनशेनव्वद स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे –

प्रथम क्रमांक – रामतांडव (रुपये ५०००/-),
द्वितीय क्रमांक – व्यंकटेश सुप्रभातम् (रुपये ४०००/-),
तृतीय क्रमांक – महिषासुरमर्दिनी (रुपये ३०००/-),
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक – कनकधारा,
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक – शिवतांडव,
उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक – विष्णुसहस्त्रनाम
(प्रत्येकी रुपये २०००/-)
सर्व विजेत्या संघांना प्रशस्तिपत्रक आणि स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
विधानपरिषद आमदार उमा खापरे यांनी स्पर्धेचे उद्घाटन करताना, “भारतीय संस्कृतीचे संचित असे जपून ठेवले तर पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणाचे भय वाटणार नाही!” असे विचार मांडले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती महिला विभागप्रमुख सुनीता शिंदे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची माहिती दिली; तर डॉ. नीता मोहिते यांनी आपल्या मनोगतातून क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने आपल्या चार विभागांच्या माध्यमातून पन्नास वर्षांच्या कालावधीत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अखंड भारतमाता, क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या प्रतिमांचे पूजन, दीपप्रज्वलन आणि सरस्वतीस्तवन करून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. एकाच रंगसंगतीची पारंपरिक वेषभूषा परिधान केलेले संघ, शंख-टाळ-डमरू अशा पूरक वाद्यांचा वापर, सुस्पष्ट नादमयी शब्दोच्चार, कोणत्याही स्तोत्राची न झालेली पुनरावृत्ती अशा ठळक वैशिष्ट्यांमुळे स्पर्धा कमालीची रंगतदार अन् अटीतटीची झाली. नरेंद्र कुलकर्णी, अरुंधती देशमुख, भारती कुलकर्णी आणि सोपान गोंटला यांनी परीक्षण केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती सदस्य, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. योगिश्वरी महाजन यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली शिंदे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.