राज्यसभेसाठी भाजपची विनोद तावडे, पंकजा मुंडे, नारायण राणे यांना उमेदवारी ?

0
138

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – येत्या २७ फेब्रुवारीला राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार राज्यसभेच्या एकूण सहा जागांपैकी तीन जागा भाजप, शिंदे गटाला एक आणि अजित पवार गटाच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता आहे. भाजपच्या वाट्याला सर्वाधिक तीन जागा येत असल्याने पक्षाकडून कोणत्या नेत्यांना उमेदवारी दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यसभेवर वर्णी लावण्यासाठी भाजपमध्ये प्रचंड चुरस असून पक्षाचे अनेक प्रमुख नेते या शर्यतीमध्ये असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र भाजपकडून नऊ नेत्यांची यादी दिल्लीत पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. यापैकी आता कोणत्या तीन नेत्यांना भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व संधी देणार, हे पाहावे लागेल. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये नऊ जणांची नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची नावे निश्चित असल्याचे सुत्रांनी सांगितले.

यामध्ये दरवेळीप्रमाणे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदरासंघात पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी पराभूत केले होते. त्यानंतर राज्यातील प्रत्येक विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत राहिले होते. मात्र, शेवटच्या क्षणी पंकजा मुंडे या शर्यतीमध्ये मागे पडत होत्या. परिणामी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या आशा धुळीस मिळत होत्या. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवून भाजप त्यांचे पुनर्वसन करणार का, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. नाराज ओबीसी वर्गाला संधी म्हणून पंकजा मुंडे यांचे नाव प्राधान्याने घेण्यात आले, असेही सांगण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पंकजा मुंडे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेसाठी संधी दिली जाईल, अशी दाट शक्यता आहे.

याशिवाय, भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळू शकणाऱ्या नेत्यांमध्ये नारायण राणे किंवा विनोद तावडे तसेच ज्येष्ठ नेते माधव भंडारी आणि चित्रा वाघ यांचाही समावेश आहे. माधव भंडारी हे भाजपच्या जुन्या फळीतील नेते म्हणून ओळखले जातात. २०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून माधव भंडारी यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा अनेकदा व्हायची. मात्र, त्यांना अपेक्षित अशी जबाबदारी मिळू शकली नव्हती. गेल्या काही काळात भाजपमध्ये बाहेरुन आलेल्या नेत्यांना महत्त्वाची पदे मिळाली आहेत. त्यामुळे पक्षाच्या जुन्या फळीत काहीशी नाराजी आहे. अशावेळी माधव भंडारी यांना राज्यसभेवर पाठवून भाजपच्या जुन्या केडरला संतुष्ट केले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजप पक्षात तुलनेने नवख्या असलेल्या चित्रा वाघ यांचे नावही राज्यसभेसाठी चर्चेत आहे. चित्रा वाघ यांनी भाजप विरोधी पक्षात असताना अनेक मुद्द्यांवरुन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करुन सोडले होते. त्यांनी महिला अत्याचाराची अनेक प्रकरणे लावून धरली होती. आक्रमक वकृत्त्व आणि पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडण्याच्या कौशल्यामुळे चित्रा वाघ यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. कोण राज्यसभेत जाईल, कोण जाणार नाही, याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात. पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं की लोकसभेत पाठवायचे किंवा त्यांना कुठलं पद द्यायचे, याचा निर्णय केंद्रीय पार्टी घेईल. मला विश्वास आहे की, केंद्रीय पार्टी चांगला निर्णय घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल
भाजप : 104,
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 42
शिवसेना (एकनाथ शिंदे गट): 40
काँग्रेस : 45
शिवसेना उद्धव ठाकरे गट : 16
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 11
बहुजन विकास आघाडी : 3,
समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी 2,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी 1
अपक्ष 13