राजेंद्र पवार व उज्ज्वला पवार यांना ‘आदर्श मातापिता पुरस्कार’ प्रदान

0
203

पुणे, दि. २० (पीसीबी) : महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व सौ. उज्ज्वला पवार यांना सोमवारी (दि. १९) ज्येष्ठ नेते खासदार श्री. शरद पवार यांच्याहस्ते ‘आदर्श मातापिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, आमदार श्री. रवींद्र धंगेकर, अ. भा. शिवमहोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. विकास पासलकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीकडून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजीनगर येथील ‘एआयएसएसएमएस’ शिक्षण संस्थेच्या प्रांगणात शिवमहोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला. समाजात आदर्शवत काम करणाऱ्या व नवीन पिढीला घडविणाऱ्या दाम्पत्यांना ‘आदर्श मातापिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. या पुरस्कारासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व सौ. उज्ज्वला पवार यांची निवड करण्यात आली. या दाम्पत्याचा ज्येष्ठ नेते खासदार श्री. शरद पवार यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला विराज तावरे, प्रशांत धुमाळ, सतीश शेलार, उद्योजक प्रतिक राजेंद्र पवार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.