“रसिकांच्या पसंतीशिवाय गझल अपूर्ण असते!” – डॉ. शिवाजी काळे

0
212

पिंपरी,दि. २७ (पीसीबी) “रसिकांच्या पसंतीशिवाय गझल अपूर्ण असते! जेव्हा सामान्य माणूस आपल्या बोलण्यातून गझलमधील शेरांचे दाखले देईल, तो मराठी गझलेचा सुवर्णकाळ असेल!” असे भावोद्गार डॉ. शिवाजी काळे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, पिंपरी येथे रविवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी काढले. गझलपुष्प या कला, साहित्य सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या संस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. शिवाजी काळे यांना सुप्रसिद्ध गझलकार रूपेश देशमुख यांच्या हस्ते ‘गझलपुष्प प्रचार व प्रसार पुरस्कार २०२३’ प्रदान करून गौरविण्यात आले. उद्योजक विलास शिंदे, संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या वैभवी सुर्वे, गझलगंधर्व सुधाकर कदम, गझलकार प्रमोद खराडे, गझलपुष्पचे अध्यक्ष संदीप जाधव, ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. रूपेश देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “गझलेमध्ये रदीफ आणि काफिया यांचा प्रभावी वापर महत्त्वाचा असतो!” असे मत मांडले. संदीप जाधव यांनी प्रास्ताविकातून २०१८ पासून मराठी गझलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी गझलपुष्प सातत्याने कार्यरत असल्याची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘गझललेखन स्पर्धा पुरस्कार २०२३’ च्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
परीक्षक डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी, सुमारे १०८ स्पर्धकांमधून अंजली दीक्षित – पंडित (प्रथम), महेश मोरे (द्वितीय) आणि तुषार शिंदे (तृतीय) विजेते ठरल्याचे जाहीर केले. उद्घाटन सत्रानंतर डॉ. शिवाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या मुशायऱ्यात आत्माराम जाधव, प्रशांत पोरे, प्रदीप तळेकर, नीलेश शेंबेकर, संजय खोत, मीना शिंदे, रेखा कुलकर्णी यांनी वैविध्यपूर्ण गझलांचे प्रभावी सादरीकरण करून रसिकांची मने जिंकून घेतली.

भोजनोत्तर सत्रामध्ये सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. शिवाजी काळे यांच्या हस्ते अभिजित काळे लिखित ‘मनाचा गूढ गाभारा’ या गझलसंग्रहाचे प्रकाशन काळे कुटुंबीयांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या गझलसंग्रहावर भाष्य करताना प्रा. जयंत जोर्वेकर यांनी, “भगवान श्रीकृष्ण यांनाच मनाचा गूढ गाभारा उकलता आला!” असे मत व्यक्त केले; तर प्रा. भारती जोगी यांनी, “समर्पक मुखपृष्ठ असलेल्या मनाच्या गूढ गाभाऱ्याचे दरवाजे आता रसिकांसाठी उघडले आहेत!” असे भाष्य करीत संग्रहाचे अंतर्बाह्य सौंदर्य उलगडून सांगितले. अभिजित काळे यांनी आपल्या मनोगतातून, “आतून जे येत गेले ते लिहीत गेलो!” अशा शब्दांतून आपल्या लेखनाविषयीची भूमिका ‌ मांडली. प्रमोद खराडे यांनी, “अभिजित काळे यांच्या अंतरंगात एकाचवेळी गझलकार अन् कार्यकर्ता अशा दोन व्यक्ती वावरतात!” असे गौरवोद्गार काढले.

प्रकाशनानंतर रूपेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मुशायऱ्यात शाम खामकर, शिव डोईफोडे, सरोज चौधरी, नंदकुमार मुरडे, गणेश भुते, समृद्धी सुर्वे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, हेमंत जोशी यांनी सादर केलेल्या गझला रसिकांना खूप भावल्या. ‘सूरसंवाद’ या विशेष सत्रात गझलगंधर्व सुधाकर कदम यांच्याशी सुसंवाद साधून प्रा. दिनेश भोसले यांनी कदम यांच्या सुमारे ५४ वर्षांपासूनची गझलगायकीची वाटचाल श्रोत्यांसमोर मांडली. यावेळी सुधाकर कदम यांनी, “गझलगायनासाठी शास्त्रीय संगीताची सखोल जाण असणे आवश्यक आहे!” असे मत व्यक्त करून गझलकारांच्या प्रमाणात गझलगायक निर्माण व्हायला हवेत, अशीही अपेक्षा व्यक्त केली. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलेल्या काही गझलांच्या ओळींचे हार्मोनियमच्या सुरात सुरेल सादरीकरण करीत वर्धापनदिन सोहळ्याचा कळसाध्याय गाठला.

दिवसभर रंगतदार झालेल्या गझलपुष्पच्या वर्धापनदिन सोहळ्यात सुरेश कंक, सूर्यकांत भोसले, शोभा जोशी, आत्माराम हारे, कैलास भैरट, मुरलीधर दळवी, राजेंद्र घावटे, आरजे प्रशांत गाडेकर, श्यामराव सरकाळे, जयश्री गुमास्ते, प्रा. डॉ. संदीप सांगळे, प्रा. डॉ. धनंजय भिसे, प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, जयश्री श्रीखंडे, आनंद गायकवाड, अरविंद दोडे, प्राजक्ता पटवर्धन, सुनीती लिमये, अनिल आठलेकर, सोनाली वाघमारे, वाणी ताकवणे, माधुरी विधाटे, शरद शेजवळ, वैभव कुलकर्णी, विजय वडवेराव यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या संयोजनात आदेश कोळेकर, सुहास घुमरे, निषाद कदम, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर यांनी सहकार्य केले. अनुक्रमे सारिका माकोडे, अभिजित काळे, रेखा कुलकर्णी यांनी विविध सत्रांचे सूत्रसंचालन केले.