रसायनयुक्त पाणी इंद्रायणीत

0
27

रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याने पुन्हा एकदा पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग (फेस) आला आहे. मागील सलग तीन दिवसांपासून नदीतील पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग येत आहे. दरम्यान, इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या जाधववाडीतील एका भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंद्रायणी नदीचा उगम हा लोणावळा परिसरातून झाला. ही नदी अनेक गावे, शहर पार करत आळंदीतून पुढे वाहत जाते. इंद्रायणी नदीचे १९ किलोमीटर पात्र पिंपरी-चिंचवड शहरातून वाहते. शहरातील औद्योगिक वसाहती, इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी, गावांमधील मैलायुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. मैलायुक्त पाणी हे इंद्रायणी नदीला प्रदूषित करत आहे.

इंद्रायणी नदी पात्रात लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करून माऊलींचे दर्शन घेतात. परंतु, नदीची अवस्था बघता लाखो वारकऱ्यांचे आणि आळंदीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच जलपर्णीने इंद्रायणीचा श्वास गुदमरत आहे. आता त्यात जलप्रदूषणाची भर पडली असून अवघ्या नदीपात्रात तवंग दिसत आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्यानेच नदीची अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून आळंदी येथील पाण्यावर पुन्हा तवंग येत आहेत.

भंगार व्यावसायिकावर गुन्हा
रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडून नदी प्रदूषण केल्याने जाधववाडीतील भंगार व्यावसायिक रेहान एंटरप्रायजेसचे मालक अब्दुलमलीक अब्दुलजब्बार खान याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खान याचे कुदळवाडी परिसरात भंगारचे गोदाम आहे. त्याच्या गोदामातून रसायनयुक्त हिरवे लाल रंगाचे सांडपाणी इंद्रायणी नदीत मिसळत असल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत महापालिकेकडून पाहणी करून खातरजमा करण्यात आली. भंगार गोदाम लाखबंद (सील) करण्यात आले.

नदी पात्रात राडारोडा टाकणारे, रसायन मिश्रित पाणी सोडणारे यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. नदी पात्रात पाणी सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली असल्याचे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल यांनी सांगितले.