भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

493

वराळे, दि. ६ (पीसीबी) – भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 3) रात्री दहा वाजताच्या सुमारास वराळे येथे घडली.

करण लक्ष्मण डोंगरे (वय 19, रा. देहूगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अमोल राजू बोटे (वय 31, रा. देहूगाव) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण डोंगरे हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14/केके 4930) जात होते. त्यावेळी वराळे बाजूकडून आलेल्या एका वाहनाने डोंगरे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामध्ये डोंगरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराची गरज असताना देखील अज्ञात वाहन चालकाने त्यांना जखमी अवस्थेत सोडून घटना स्थळावरून पळ काढला. दरम्यान, गंभीर जखमी झाल्याने डोंगरे यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.