योगी आदित्यनाथ यांचा संभाजी ब्रिगेडकडून निषेध

56

रामदासांचे उदात्तीकरण थांबण्याचे आवाहन

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – ११ फेब्रुवारी रोजी योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता-भक्ती अमृत महोत्सवाला उपस्थिती लावली असता यावेळी आपल्या भाषणात योगी आदित्यनाथ म्हणाले, “समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविल्यात्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतभर चेतना निर्माण केली.” योगी आदित्यनाथ यांचे विधान हे अत्यंत चुकीचे असून शिवरायांच्या गुरू फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ होत्या आणि आध्यात्मिक गुरू म्हणून संत तुकाराम महाराज यांनी कार्य केले. बहुतांश इतिहास अभ्यासक आणि इतिहासकारांच्या मते 1672 पूर्वी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे उल्लेख नाहीत. त्यामुळे स्वराज्य निर्मितीच्या काळात, तसेच शिवाजी महाराज यांच्या बालपणी रामदासांनी मार्गदर्शन केले असावे याबाबत पुरावे सापडत नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सध्याचे वारस यांच्याद्वारे तसेच अनेक जानकार इतिहासकारांनी रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु मार्गदर्शक नव्हते हे पुराव्यानिशी सिद्ध केले असताना देखील रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते असे वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या लोकांकडून जाणून बुजून समाजात खोटा इतिहास पसरवण्याचे काम केले जात आहे. राजमाता जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक गुरू होत्या. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे असल्यामुळे त्यांचा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास नसेल त्यांनी तो करावा आणि आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करतांना दिसून येत असल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जाहीर निषेध करत आहोत असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले प्रसिद्धी पत्रकावर पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण सचिव वैभव जाधव शहराध्यक्ष सतिश काळे उपाध्यक्ष रावसाहेब गंगाधरे संघटक संतोष शिंदे गणेश कुंजीर,कल्पनाताई गिड्डे,वसंत पाटील यांच्या सह्या आहेत.