‘येत्या १५ दिवसांत शरद पवार PM मोदींना पाठिंबा देतील’; रवी राणा यांचा मोठा दावा

0
327

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : ‘येत्या पंधरा दिवसांत शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी अमरावतीत केला आहे. रवी राणा यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार राष्ट्रवादीला घेऊन भाजप बरोबर जाताना त्यांनी शरद पवार यांनासुध्दा आणायचे तरच त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याचे भाजपने कबूल केले होते. प्रत्यक्षात शरद पवार तटून बसले आणि अजितदादांचे मुख्यमंत्रीपद हुकले. गेल्या पंधरा दिवसांत अजितदादांना भाजुने साईडट्रॅक केले असून थेट शरद पवार यांना टार्गेट करण्यासाठी त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्या कंपन्यांवर ईडी कारवाई सुरू केली आहे. बारामती अग्रो या कंपनीच्या दोन कार्यालयांना गुरुवारी मध्यरात्री टाळे ठोकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्याप्रमाणेच शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर दबाव वाढवायचा आणि त्यांना भाजपला शरण येणे भाग पाडायचे अशी खेळी भाजपने सुरू केली आहे.

आमदार रवी राणा यांनी अमरावतीत गणेश विसर्जनानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार रवी राणा यांनी मोठं राजकीय भाष्य केलं. रवी राणा म्हणाले, ‘मुंबईला आठ दिवसांपूर्वी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलो. तेव्हा लालबागच्या राजाकडे मागितलं की, देशात पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे काम सुरू आहे, त्यांचं काम पाहून अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यांनी केंद्रातही देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला आहे’.

‘शरद पवारांनीही पंतप्रधान मोदींच्या कामाला पाहून पाठिंबा द्यायला हवा. त्यांनी सरकारमध्ये सामील झालं पाहिजे. शरद पवारांनी केंद्र आणि राज्यात सरकारला पाठिंबा द्यायला पाहिजे, असं साकडं लालबागच्या राजाकडे केलं असल्याचे रवी राणा यांनी सांगितलं.

‘राज्यभरात सर्वत्र गणपतीच्या दर्शनासाठी गेलो, तिकडे शरद पवारांनी सरकारला पाठिंबा द्यायला हवा, अशीच प्रार्थना केली. मला विश्वास आहे की, हा चमत्कार हा येत्या १०-१५ दिवसांत दिसेल. त्यामुळे लवकरच शरद पवारांच्या पाठिंब्याच्या जोरावर सरकार दिसेल, असाही दावा रवी राणा यांनी केला.अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबतच्या चर्चांवर भाष्य करताना रवी राणा म्हणाले, ‘अजित पवार मुख्यमंत्री होतील अशा चर्चा मी देखील ऐकल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, ते उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते. ते आता उपमुख्यमंत्री झाले. ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते, ते मुख्यमंत्री झाले. राजकारण कोणतीही गोष्ट शक्य आहे. येत्या पंधरा दिवसांत शरद पवार सरकारसोबत आले तर हेही शक्य आहे’.