येत्या नऊ दिवसांत काहीपण घडू शकते, शिंदे गटाच्या आमदाराची माहिती

135

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. तेव्हापासून शिंदे गटाच्या नेत्यांकडून लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याबाबत अनेकदा दावा करण्यात आला. मात्र, अद्यापही शिंदे गटातील काही नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळालेलं नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी होऊन अजित पवार गटातील नेत्यांना मंत्रीपदं मिळाली. यामुळे पालकमंत्रीपदाचाही वाद निर्माण झाला आणि शिंदे गट – अजित पवार गटाचे नेते आमनेसामने आले. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्रीमंडळ विस्तारावर सूचक वक्तव्य केलं आहे.

भरत गोगावले म्हणाले, “हिवाळी अधिवेशनाला वेळ आहे. या अधिवेशनाला अद्याप ९ दिवस बाकी आहेत. या ९ दिवसात काहीही घडू शकेल, त्याबाबत काही सांगू शकत नाही. आमचे कोट तयार आहेत. त्या कोटची कुणीही काळजी करू नये. ते कोट काही फुकट जात नाहीत. ते सांगतील तेव्हा आम्ही हे कोट बाहेर काढू.”

“आम्ही शिवसैनिक कायम तयारीत असतो. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. त्यांनी या क्षणाला जरी सांगितलं तरी आम्ही तयार आहोत. यावेळच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मी १०० टक्के आशावादी आहे. मी का आशावादी नसावं. आम्ही काम करतो. काम करणाऱ्यांनी आशावादी नाही राहायचं, मग काम न करणाऱ्यांनी आशावादी राहायचं का?” असा सवाल करत भरत गोगावले यांनी आपली मंत्रीपदाची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली.