दि . २३ ( पीसीबी ) – जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. या निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा फोटो आता समोर आला आहे. पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा फोटो समोर आला आहे. चौघेही पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून हा कट रचला जात होता. पाकिस्तानातून हे हल्लेखोर त्या ठिकाणी आले होते, त्या ठिकाणी असलेल्या स्लीपर सेलच्या मदतीने या हल्लेखोरांनी हल्ले केले. यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांच्या चेहरा दिसणारा हा पहिला फोटो समोर आला आहे. काश्मिरमधील नागरिकांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांचा हा फोटो समोर आल्याचं दिसून येत आहे.
पोलिसांनी दहशतवाद्यांचे रेखाचित्र केले जारी
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे रेखाचित्र देखील पोलिसांनी जारी केले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या पिडित पर्यटकांशी बोलून ही रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत. त्या दहशतवाद्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. तीन हल्लेखोरांचे स्केच बनवण्यात आलेले आहे. हा हल्ला 7 ते 8 जणांनी हल्ला केल्याची माहिती आहे. मात्र, त्यापैकी तिघांचे स्केच बनवण्यात आले आहेत. हे 3 दहशतवादी आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तलह यांची रेखाचित्रे आहेत. त्यांचा कसून तपास घेतला जात आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. यादरम्यानच पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशदवाद्यांचे स्केच जारी करण्यात आले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, सर्व लष्करी तुकड्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर आणि अंतर्गत भागातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, तीन दहशतवाद्यांचे रेखाचित्र समोर आले आहेत आणि त्यांची नावेही उघड झाली आहेत. पहलगाममध्ये आदिल, आसिफ, सुलेमान यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या घटनेत दोन स्थानिक दहशतवादीही सहभागी असल्याचे वृत्त आहे. सध्या, मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू आहे, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी हल्ला झाला, तिथे नेहमीच सुरक्षा दलांची संख्या कमी राहिली आहे, तिथे कधीही कडक सुरक्षा व्यवस्था दिसली नाही. याचाच फायदा घेत दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.
महाराष्ट्रातील मृतांची नावे
1) अतुल मोने – डोंबिवली
2) संजय लेले – डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
जखमींची नावे
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल