“या” राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना सीआयडीकडून अटक…!

0
244

देश, दि. ०९ (पीसीबी) – शनिवारी पहाटे गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना अटक केली, असे पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. सीआयडीने त्यांच्या नावाचे अटक वॉरंट बजावले होते. एपी स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन घोटाळा प्रकरणात नायडूंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. डीआयजींनी दिलेल्या माहितीनुसार एपी स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन घोटाळा प्रकरणात चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ते आरोपी क्रमांक एक असून त्या दृष्टीने त्यांना नोटीस देण्यात आली होती.

नंद्याल रेंजचे डीआयजी रघुरामी रेड्डी आणि सीआयडी यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचा मोठा फौजफाटा शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये नायडूंना ताब्यात घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी ते कॅराव्हॅनमध्ये विश्रांती घेत होते. त्याठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या टीडीपी कार्यकर्त्यांनी पोलिसांना तीव्र प्रतिकार केला. चंद्राबाबू नायडूंचे रक्षण करणार्‍या एसपीजी दलांनीही पोलिसांना परवानगी दिली नाही. नियमानुसार पहाटे साडेपाच वाजेपर्यंत कोणालाही नायडूंपर्यंत पोहोचू दिलं जाऊ शकत नाही, असं कारण एसपीजीने पुढे केलं.

दरम्यान सकाळी सहा वाजताच्या सुमारास, पोलिसांनी चंद्राबाबू नायडू यांच्या कॅराव्हॅनचे दरवाजे ठोठावले, त्यांना खाली आणले आणि अटक केली. चंद्राबाबूंनीही आरोपांचे पुरावे न दाखवता अटकेची कारवाई सुरू केल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. पुरावे सादर केले तरच कायद्याला सहकार्य करू, असे चंद्राबाबू म्हणाले.

रवींद्र वायकर यांची हॉटेलसंबंधी याचिका फेटाळली; पालिकेविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय

नायडूंना अटक करण्यापूर्वी सीआयडीने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह असल्याचे आढळून आलेस असे नायडूंच्या वकिलाने सांगितले. आम्ही जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करत असल्याचंही वकिलांनी सांगितलं.

२०१८ ला चंद्राबाबूंच्या टीडीपीने मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला, तेव्हा काय घडलेलं?

एपी स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन घोटाळा प्रकरणात सीआयडीने ९ डिसेंबर २०२१ रोजी एफआयआर नोंदवून २५ जणांना आरोपी घोषित केले होते. विशेष म्हणजे नायडू यांचे नाव एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नव्हते. मात्र तपासात समोर आलेल्या तपशिलांच्या आधारे नायडू यांना अटक करण्यात येत असल्याचा दावा सीआयडीने केला आहे.

दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांनी तेलुगु देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.