…म्हणून यावेळी भाजपकडून चिंचवड विधानसभा जाणार?

0
425

लोकसभा निवडणुकित महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक तब्बल ७६ हजारांचे मताधिक्य देणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातच भाजपची खरी कसोटी लागणार आहे. लोकसभा निवडणुकिप्रमाणेच आता विधानसभेलाही महायुती आणि महाआघाडीच कायम राहणार असल्याचे दोन्ही बाजुंच्या नेत्यांनी निकालानंतर सांगितले. दरम्यान, स्वतंत्रपणे मोर्चेबांधनी करणाऱ्या अनेक इच्छुकांची आता कुचंबना झाली आहे. गेल्या दोन निवडणुकांतील मताधिक्याचा थोडक्यात आढावा घेतला तर दुरंगी लढत झाल्यास यावेळी भाजपकडून चिंचवड विधानसभा हातातून सहज निसटू शकते, असे चित्र आहे.

महायुतीमध्ये भाजपकडून आमदार अश्विनी जगताप यांनी पुन्हा लढण्यासाठी गोठीभेटी सुरू केल्याने पक्षांतर्गत अन्य इच्छुकांची धावपळ सुरू आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनामुळे दोन वर्षांसाठी त्यांच्या पत्नी श्रीमती अश्विनी यांना उमेदवारी देण्यात आली. खरे तर, पोटनिवडणूक बिनविरोध अपेक्षित होती, पण राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने निवडणूक झाली. जगताप यांच्या निधानामुळे आश्विनीताईंना सहानुभूती मिळाली आणि त्या ३८ हजार मतांनी जिंकल्या. त्यांना १ लाख ३८ हजार मते मिळाली, तर अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना ९९ हजार मते मिळाली होती. शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी अपक्ष असताना ४५ हजार मते घेतली होती. याचाच दुसरा अर्थ भाजप तसेच जगताप कुटुंबाच्या विरोधातील मतांचे प्रमाण अधिक होते. अश्विनी जगताप या केवळ सहानुभूतीच्या लाटेवर जिंकल्या, मात्र त्यांच्या जागेवर दुसरा कोणीही उमेदवार असता तर त्याचवेळी भाजपचा इथे दारूण पराभव झाला असता.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकित महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवड विधानसभेतून ७६ हजारांचे मताधिक्य मिळाले. २०१९ मध्ये बारणे यांना चिंचवडमधून तब्बल ९६ हजारांचे मताधिक्य होते. यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेंची शिवसेना एकत्र असूनही मताधिक्य वाढण्याएवजी २० हजारांनी घटले. २०२४ च्या या निवडणुकित एकूण ६ लाख १८ हजार मतदारांपैकी ३ लाख २२ हजार मतदान झाले. बारणे यांना १ लाख ८६ हजार आणि त्यांचे प्रतिस्पर्धी महाआघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांना १ लाख ११ मते मिळाली.

विधानसभेला २०१९ मध्ये स्वतः दिवंगत लक्ष्मण जगताप भाजपचे उमेदवार असताना त्यांच्या विरोधात सर्व पक्षांत प्रचंड असंतोष खदखदत होता. दुरंगी लढत झाली तर जगताप यांचा पाडाव सहज शक्य आहे हे लक्षात आल्याने त्यावेळी राजकीय विरोधकांनी अगदी ठरवून प्रयोग केला. तोडिस तोड म्हणून जगताप यांच्याच तालमित तयार झालेले शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना सर्वांनी पाठिंबा दिला आणि दुरंगी सामना रंगला होता. अत्यंत चुरस झाली आणि जगताप कसेबसे ३८ हजारांनी जिंकले. त्यांना दीड लाख मते मिळाली तर, कलाटे यांनी १ लाख १२ हजार मते मिळाली होती. थोडक्यात भाजप आणि जगताप विरोधातील सुमारे सव्वा ते दीड लाख मते निश्चित असल्याचे दिसते. बंडखोरी न होता खरोखर दुरंगी सामना झालाच तर भाजपला ही जागा कायम ठेवण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागणार आहे.

इच्छुकांचा मांदियाळी –
चिंचवड विधानसभेसाठी श्रीमती जगताप यांच्याशिवाय त्यांचे सख्खे दिर आणि पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकरशेठ हे प्रबेळ दावेदार समजले जातात. जगताप कुटुंबाच्या बाहेरील उमेदवार द्यायचा तर शत्रृघ्न काटे यांचे नाव भाजपमधून पुढे येऊ शकते. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून पोटनिवडणुकित ९९ हजार मते मिळविणारे नाना काटे यांनी पुन्हा आपल्यालाच उमेदवारी मिळेल या आशेवर मोर्चेबांधनी सुरू केली आहे. सर्वात जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आता पुन्हा संधी नाही म्हणून सहा महिन्यांपासून लढायचंच या बेताने जोरबैठका सुरू केल्या आहेत. २०१४ मध्ये अपक्ष लढलेले रावेतचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवकांपैकी माया बारणे, चंद्रकांत नखाते, नवनाथ जगताप, संदीप चिंचवडे इच्छुक आहेत. महाआघाडीतून शिवसेना ठाकरे गटातून पुन्हा राहुल कलाटे हेच दमदार नाव रिंगणात येऊ शकते. यापूर्वी दोनदा निवडणूक लढविलेले कलाटे यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार झालेले डॉ.अमोल कोल्हे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्याने कदाचित ते तुतारी हातात घेतील अशीही चर्चा आहे. वेळप्रसंगी महायुतीची उमेदवारी पुन्हा भाजपकडे आणि जगताप कुटुंबातच गेली तर अन्य इच्छुकांपैकी कोणीही महाआघाडीचा उमेदवार असू शकतो. महाराष्ट्रात महाआघाडीचे जबरदस्त वारे असल्याने महायुतीत संधी मिळाली नाही तर अपक्षांची संख्यासुध्दा वाढण्याची दाट शक्यता आहे.