मोहननगर, काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, चिंचवड भागातील पावसाळ्यापूर्व कामे, नालेसफाई करा

0
398

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांची मागणी

अ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सध्या पावसाळ्या पूर्वीच्या कामांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मोहननगर, काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, चिंचवड या भागातील पावसाळ्या पूर्वीची कामे तातडीने हाती घ्यावीत. पावसाळ्यात पाणी साठू नये अथवा तुंबू नये, यासाठी नालेसफाई , ड्रेनेजलाईनची साफसफाई करावी. धोकादायक झाडांच्या फांद्या तत्काळ छाटून घ्यावात, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे.

याबाबत काळभोर यांनी अ क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की,
पुढील महिन्यापासून पावसाळा सुरू होत आहे. महापालिकेने दरवर्षी प्रमाणे काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, मोहननगर, चिंचवड या भागातील नालेसफाई, ड्रेनेजलाईनची योग्य पध्दतीने साफसफाई करावी. जेणेकरून पावसाळ्यात पाणी तुंबून राहून वाहतूक कोंडी अथवा नागरिकांची गैरसोय होऊ नये.

गावठाण भागांमध्ये काही बैठ्या चाळी, अरूंद भाग आहे. अशा ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचत असल्याच्या यापूर्वी काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी साचत आहे, अशा ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करून योग्य त्या उपाय योजना कराव्यात.

तसेच पावसाळ्यात वादळी वारे येण्याची शक्यता असते. त्यामुळे मुख्य रस्ते अथवा अंतर्गत रस्त्यांवरील धोकादायक झाडांच्या फांद्या पडून एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी अशा धोकादायक झाडांच्या फांद्या तत्काळ छाटून घ्यावात, अशी मागणी विशाल काळभोर यांनी केली आहे.