मोस्ट वाँटेड हाफिज सईदचा मुलगा बेपत्ता असल्याची बातमी व्हायरल…!

0
512

विदेश,दि.२८(पीसीबी) – कुख्यात दहशतवादी आणि हिंदुस्थानसाठी मोस्ट वाँटेड असलेला हाफिज सईद याचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर काही माध्यमांनी आपल्या एक्स हँडलवरून हा दावा केला आहे की, हाफिज सईदचा मुलगा कमालुद्दीन सईद मंगळवार संध्याकाळपासून बेपत्ता आहे.

एका एक्स हँडलवरून हा दावा करण्यात आला आहे. कमालुद्दीन सईदला काही अज्ञातांनी पळवून नेल्याचं या हँडलचं म्हणणं आहे. कमालुद्दीन सईदला पेशावरवरून काही अज्ञात लोकांनी गाडीत बसवलं आणि पळवून नेलं. आयएसआय ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था देखील त्याचा माग काढण्यात यशस्वी झालेली नाही आणि त्याचा काही मागमूसही लागलेला नाही. या घटनेनंतर आयएसआय आणि अन्य पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, काही अन्य एक्स हँडलवरून असाही दावा करण्यात आला आहे की, हाफिज सईदचा मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्याचा माग काढण्यासाठी आयएसआय जमीन आसमान एक करत आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून वाँटेड दहशतवाद्यांची हत्या करण्यात येत आहे. त्यात हिंदुस्थानातून पळून गेलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांचाही समावेश आहे. गेल्यावर्षी हाफिज सईदच्या घराशेजारी बॉम्बस्फोट झाला होता आणि त्याला मारण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा आयएसआयने केला होता.