मोशी रुग्णालयाची निविदा जादा दराची, प्रशासनाच्या स्थायी समितीची बिनबोभाट मान्यता

172

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) : नगरसेवक नसल्याने कोणी जाब विचारायला नाही म्हणून गेल्या पावणे दोन वर्षांत महापालिकेतील बहुतांश सर्वच निविदा वाढीव दराच्या असून बेसुमार लूट सुरू आहे. पूर्वी लोकप्रतिनिधींची स्थायी समिती टक्का घेत होती आता महापालिका प्रशासनाची स्थायी समिती वसुलीच्या मागे लागल्याचे दिसते. महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांतील रहिवाशांसाठी मोशीमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ८५० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने ठेकेदारावर मेहरबानी दाखवत पाच टक्के वाढीव दराची निविदा स्वीकारली आहे. ३४० कोटी रुपयांचा निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली. रुग्णालयाच्या कामासाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.

महापालिका हद्दीत १९९७ मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. चिखली, मोशी, चऱ्होली या भागात मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या होत आहेत. नागरीकरण वाढले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, चाकण, जुन्नर, मंचर, आंबेगाव या भागातील नागरिक उपचारासाठी शहरात येतात. हे रुग्ण वायसीएम रुग्णालयात दाखल होतात.
शहराची लोकसंख्या आजमितीला २७ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून चालवले जाणाऱ्या ७५० खाटांच्या वायसीएम रुग्णालयावर ताण येत आहे. वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी मोशीत ८५० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदा प्रक्रियेत पाच ठेकेदारांनी सहभाग घेतला. यामध्ये तीन निविदा पात्र झाल्या होत्या. मे. वॅसकॉन इंजिनिअर्स लिमिटेड या कंपनीची ४.७३ टक्के वाढीव दराची निविदा स्वीकारली आहे. त्यानुसार ३४० कोटी ६७ लाख ६३ हजार २७३ रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.