मोशी येथे साडे सहा लाखांचा गुटखा पकडला

415

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

मोशी, दि. २३ (पीसीबी) – मोशी प्राधिकरण येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत साडेसह लाख रुपयांचा गुटखा पकडला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 22) दुपारी करण्यात आली.

किशोर हरकचंद सुंदेचा (वय 46, रा. मोशी प्राधिकरण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह गणेश गांधी (रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी रा. म. खंडागळे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी प्राधिकरण येथे एकाने गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार एमआयडीसी भोसरी पोलिसांना याबाबत माहिती देऊन अन्न व औषध प्रशासन विभागाने किशोर याच्या घराजवळ छापा मारून कारवाई केली. एका टेम्पोमध्ये सहा लाख 49 हजार 20 रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. या कारवाईमध्ये विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि आरएमडी असा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. किशोर याने हा गुटखा गणेश गांधी याच्याकडून आणला असल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.