मोशीत दोन महिलांसह चार बांगलादेशी घुसखोर गजाआड

0
104

बनावट आधारकार्ड, जन्म दाखला बनवून वास्तव्य

बनावट कागदपत्रांसह हिंदुस्थानात बेकायदेशीररित्या राहणार्‍या दोन महिलांसह चार बांगलादेशी नागरिकांना पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या दहशत विरोधी शाखेने जेरबंद केले. ही कारवाई शनिवारी (दि. ८) सकाळी सहाच्या सुमारास मोशी येथे करण्यात आली.

पूजा धन्नो सरकार उर्फ रुबाया बिलाल मासूम नूर इस्लाम शेख (वय २४), तिचा पती धन्नो अरुण सरकार (वय २६), दीर मन्नो अरुण सरकार (वय २४) आणि लाबोनी सुशील अय्यर उर्फ साथी खातून मंडल (वय २८) या चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तसेच, या आरोपीना बनावट कागदपत्रे बनवून देणार्‍या इतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. दहशत विरोधी पथकाचे पोलीस शिपाई तान्हाजी सोनवणे यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय ते हिंदुस्थानात व्हिसाशिवाय राहत होते.
हिंदुस्थान व बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकार्‍यांच्या लेखी परवानगी शिवाय ते घुसखोरीच्या मार्गाने गेल्या १२ वर्षापूर्वी हिंदुस्थानात आले.

गेल्या दोन वर्षापासून ते मोशी येथे वास्तव्यास आहेत. आरोपी धन्नो हा मोशी येथे रस्त्यावर फळविक्रीचा व्यवसाय करतो. तर, त्याचा भाऊ मन्नो हा एका कंपनीत कामाला आहे. त्यांनी बनावट आधारकार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला बनवून घेतला. त्याच आधारे ते हिंदुस्थानी नागरिक असल्याचे भासवायचे. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी सिमकार्डही प्राप्त केले. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक पठारे तपास करीत आहेत.