मोठी बातमी! विधानसभेच्या तोंडावर भाजपला धक्का! माजी मंत्र्यांच्या कन्येचा तडकाफडकी पक्षाचा राजीनामा

0
41

अक्कलकुवा, दि. 05 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणी सुरू होती. मात्र अनेक ठिकाणी बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भाजप नेत्या आणि माजी खासदार हिना गावित यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. हिना गावित यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी आता भाजपचा राजीनामा देखील दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी खासदार तसेच राष्ट्रीय प्रवक्त्या हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह पक्षाच्या विविध पदांचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे. बंडखोरीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हिना गावित या राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. विजयकुमार गावित नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आहेत. तर दुसरीकडे अक्कलकुवा मतदारसंघातून हिना गावित यांनी महायुतीच्या विरोधातच बंडखोरी केली आहे. त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हिना गावित यांच्या बंडखोरीमुळे महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत. अखेर गावित यांनी स्वत: पक्षांच्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे.

आपल्या उमेदवारीमुळे पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून आपन राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं हिना गावित यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना शिंदे गट वारंवार भाजपच्या विरोधात काम करत आहे, म्हणून आपण त्यांच्याविरोधात लढण्याचा निर्णय घेतल्याचंही यावेळी गावित यांनी म्हटलं आहे. गावित यांच्या उमेदवारीमुळे आता या मतदारसंघात एक हायहोल्टेज लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.