मेहुणीच्या लग्नाची पार्टी न दिल्याने तरुणास मारहाण

0
194

मेहुणीच्या लग्नाची पार्टी न दिल्याने चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 20) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास विठ्ठलनगर नेहरूनगर पिंपरी येथे घडली.

संतोष भीमा विधाते (वय 29, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील शिवाजी जाधव (वय 28), अनिल शिवाजी जाधव (वय 26), शिवाजी जाधव (वय 50), दीप जावळे (वय 30, सर्व रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे नातेवाईक आहेत. सोमवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला. फिर्यादी संतोष विधाते यांच्या मेहुणीच्या लग्नाची पार्टी न दिल्याच्या कारणावरून त्यांना मारहाण केल्याचे विधाते यांचे म्हणणे आहे.

पार्टी न दिल्याचा राग मनात धरून आरोपींनी विधाते यांना लोखंडी रॉडने मारून जखमी केले. तसेच त्यांच्या पाठीत व हातावर लाकडी दांडक्याने मारून जखमी केले तसेच शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.