मेट्रो स्वारगेट पर्यंत ट्रायल यशस्वी

0
206

पुणे, दि. ६ (पीसीबी) – पुणे शहरात मेट्रोच्या दोन नवीन मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी १ ऑगस्ट रोजी केले होते. त्यानंतर पुणे मेट्रो सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल या मार्गांवर मेट्रो धावत आहेत. आता पुणे मेट्रोसाठी दुसरा ऐतिहासिक क्षण सोमवारी आला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेली पुणे मेट्रो भुयारी मार्गातून धावली. पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गातील अंडरग्राउंड मेट्रोची चाचणी यशस्वी झाली. ३ .६४ किमी मार्गावर ही चाचणी घेतली गेली. लवकरच हा मार्ग महामेट्रोकडून सुरु केला जाणार आहे. मुळा मुठा नदीच्या खालून भुयारातून मेट्रोमधून प्रवासाचा अनुभव पुणेकरांना येणार आहे.

चाचणीसाठी वेग ताशी ७.५ किलोमीटर
पुणे मेट्रोतील जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक हा मार्ग मुठा नदीपात्राच्या खालून काढण्यात आला आहे. पुणे शहराच्या इतिहासात प्रथमच अंडरग्राऊड मेट्रो नदीपात्राखालून धावणार आहे. ही मेट्रो सुरु करण्यापूर्वी चाचणी घेण्यात आली. सोमवारी जिल्हा न्यायालय स्थानकातून सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी मेट्रो निघाली. त्यानंतर बुधवार पेठ स्थानक आणि मंडई स्थानक हा टप्पा पार केला. मेट्रो ११ वाजून ५९ मिनिटांनी स्वारगेट स्थानकावर पोहोचली. चाचणीसाठी मेट्रोचा वेग ताशी ७.५ किलोमीटर ठेवला होता.

किती खोल आहे भुयारी मार्ग
पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान सर्व स्थानके भुयारी आहेत. जिल्हा न्यायालयातील स्थानक ३३.१ मीटर खोल करण्यात आला. त्यानंतर बुधवार पेठ हे स्थानक ३० मीटर खोल केले गेले आहे. मंडई स्थानक २६ मीटर खोल आहे. तर स्वारगेट स्थानक २९ मीटर खोल केले गेले आहे. मेट्रोचे ९८ टक्के काम आता पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत. काही महिन्यांत ते पूर्ण होणार आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत प्रवाशांना पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट असा थेट प्रवास करणे शक्य होणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.