मेट्रोमोनियल साईटवरून संपर्क करत तरुणीवर लैंगिक अत्याचार

0
247

तळेगाव, दि. २३ (पीसीबी) – मेट्रोमोनियल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान तरुणी गरोदर राहिली. तिचा गर्भपात करून शरीरसंबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार जानेवारी 2022 ते 17 जून 2023 या कालावधीत ताथवडे, तळेगाव दाभाडे आणि आरोपीच्या कारमध्ये घडला.

आकाश शंकर जगदाळे (वय 32, रा. काडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 29 वर्षीय पिडीत तरुणीने शुक्रवारी (दि. 23) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी आकाश यांची शादी डॉट कॉम या मेट्रोमोनियल साईटवरून ओळख झाली. आकाशने शादी डॉट कॉमवर फिर्यादी यांचे प्रोफाईल पाहून त्यांचा नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्या दरम्यान फिर्यादी गरोदर राहिल्या. त्यानंतर आकाश याने ‘तू जर गर्भपात केला तरच मी तुझ्याशी लग्न करेन. अन्यथा मी तुझ्याशी लग्न करणार नाही’ अशी धमकी दिली. फिर्यादीच्या मनाविरुद्ध गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादीने आकाशकडे लग्नाबाबत विचारणा केली असता आकाशने फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यांचा शारीरिक संबंध करतानाचा व्हिडीओ आकाशने फिर्यादीस दाखवला. ‘तू जर मला त्रास दिला तर मी तुझे व्हिडीओ व्हायरल करेन’ अशी त्याने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.